प्रतिनिधी | नाशिक
प्रभाग क्रमांक दोनमध्ये झालेल्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याने स्थानिक नागरिक अक्षरशः हैराण झाले. लांबलेली भाषणे, गर्दी, घोषणाबाजी यानंतर या ठिकाणी उरला तो फक्त कचऱ्याचा ढीग! चहाचे वापरलेले कप, जेवणाच्या प्लेट्स, उरलेले भोजन आणि विविध प्रकारचा कचरा रस्त्यावरच टाकून देण्यात आल्याने परिसराचे रूपांतर कचरा डेपोत झाल्याचा संताप नागरिकांत व्यक्त होत आहे.
स्वच्छतेचे गोडवे गाणारे आणि जनतेसमोर विकासाचा नारा देणारे तथाकथित ‘जनतेचे सेवक’ आपल्याच कार्यक्रमानंतर परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत मात्र पूर्णपणे बेफिकीर असल्याचे दिसून आले. कार्यक्रम संपल्यानंतर कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची कोणतीही व्यवस्था न केल्याने सर्वत्र घाण व दुर्गंधी पसरली.
या सर्व प्रकारामुळे आजूबाजूच्या रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. लहान मुलांना रस्त्यावर खेळणेही मुश्किल झाले असून नागरिकांनी अशा असंवेदनशील वर्तनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
स्वच्छ भारतच्या घोषणा फक्त पोस्टरपुरत्याच राहणार का, असा थेट प्रश्न नागरिक विचारताना दिसत आहेत. प्रचारासाठी कार्यक्रम करायचा आणि नंतर कचरा नागरिकांच्या माथी मारायचा—ही कोणती जनसेवा? असा सवालही उपस्थित केला जात आहे.
—————————————————-
प्रचारासाठी झालेला सोहळा, नागरिक त्रासात अडकला!”
प्रभाग क्रमांक दोनमध्ये झालेल्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनावेळी रस्त्यांवर चहाचे कप…जेवणाच्या प्लेट्स…उरलेला कचरा…असं अस्ताव्यस्त चित्र दिसून आलं. कागद, प्लास्टिक, अन्नाचं उरलंसुरलं खरकटं — आणि त्यात भर म्हणून दुर्गंधी! या सगळ्यामुळे आसपासच्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. स्वच्छतेचे गोडवे गाणाऱ्यांनी कार्यक्रमानंतर परिसर स्वच्छ ठेवण्याची तसदीही घेतली नाही, हेच नागरिकांच्या मनात बोचत राहिलं.



























