नाशिक – विशेष प्रतिनिधी
शिकवणीसाठी येणाऱ्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करून तिच्यावर अल्पवयातच मातृत्व लादणारा नराधम संतोषकुमार श्रीमनुलाल सैनी (वय ५८, रा. शिवाजी नगर ता. दिंडोरी) यास जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती पी. व्ही. घुले यांनी जन्मठेप व एक लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. त्यातील ५० हजार रुपये पिडीतेला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
याबाबतचे अधिक वृत्त असे की, यातील पिडीता १३ वर्ष व तीन महिने वयाची असताना सन २०१९ मध्ये शिकवणीसाठी संतोष कुमार श्रीमनुलाल सैनी (वय ५८, रा. शिवाजी नगर ता. दिंडोरी) याच्या घरी जायची. आरोपी हा मुळ पोस्ट कैथा ता. घाटनपुर जिल्हा कानपुर, उत्तर प्रदेश येथील आहे. पिडीत मुलगी शिकवणीसाठी येत असताना आरोपीने तिच्याशी संबंध प्रस्थापित केले. याबाबत कोणाला सांगितलं तर वारंवार संबंध ठेवेन असे धमकावत आरोपीने अॉक्टोबर २०२३ पर्यंत हे संबध कायम ठेवले. यामुळे पिडीता गरोदर राहिली परंतू लहान असल्याने तिला समजले नाही. १६ जानेवारी २०२४ ला तिने एका मुलीस जन्म दिला. त्यानंतर या घटनेची वाच्यता झाल्याने दिंडोरी पोलिसांनी गुन्हा नोंदवला.
उपनिरीक्षक मोनिका जेजोट व हवालदार कमलेश देशमुख यांनी सखोल तपास करुन आरोपी विरूद्ध सबळ पुरावे गोळा करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याची सुनावणी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती पी. व्ही. घुले यांच्या समक्ष चालली. सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता श्रीमती लिना चंद्रकांत चव्हाण यांनी पुरावे सादर करत युक्तिवाद केला. सरकारतर्फे नऊ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांनी दिलेली साक्ष व पुरावा ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीस जन्मठेप व एक लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास २ वर्ष साधी कैद भोगावी लागेल. दंडाच्या रक्कमेपैकी ५० हजार रुपये अपील कालावधी नंतर पिडीतेला देण्यात यावे असे न्यायालयाने सांगितलं आहे. या सुनावणीदरम्यान पैरवी अधिकारी हवालदार सुजीत सुधाकर इंगळे यांनी काम पाहिले आहे.

























