– नाशिक जिमखाना येथे आयोजन…
नासिक – विशेष प्रतिनिधी
जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या वतीने राज्य अजिंक्यपद मानांकन टेबल टेनिस स्पर्धा २० ते २४ सप्टेंबर मधे होत आहे. या स्पर्धा नासिक जिमखाना येथे होणार असून या स्पर्धा एकूण आठ टेबलावर खेळविण्यात येणार आहेत. या स्पर्धा पुरुष, महिला, मुले व मुलींच्या होणार असून एकूण १२ विविध वयोगटात होणार आहेत.
स्पर्धेत ११,१३,१५,१७ व १९ वर्षाखालील मुले व मुली तसेच पुरुष व महिला यांचा समावेश आहे. २०२४ मधे झालेल्या राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राने पाच सुवर्ण पदके मिळवित महाराष्ट्राच्या टेबल टेनिस पटूंनी विविध गटाचे पाच राष्ट्रीय विजेतेपद मिळविले होते. या पाच खेळाडूंचा सन्मान करण्याच्या हेतूने महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेने या वर्षीच्या होणाऱ्या पाच राज्य स्पर्धा या खेळाडूंच्या नावाने घेण्याचे ठरविले. त्यानुसार नाशिकच्या स्पर्धा ११ वर्षाखालील राष्ट्रीय विजेतेपद मिळविणाऱ्या नाशिकच्या केशिका पुरकर हिच्या नावाने घेण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण ७९३ प्रवेशिका आल्या आहेत. या स्पर्धेत प्रीसाईज टेबल्स व डबल फिश कंपनीचे बॉल्स वापरले जाणार आहेत. नासिक जिमखाना या स्पर्धेसाठी असलेली क्रीडा संकुले विनामूल्य उपलब्ध करून दिली आहेत.
या स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनेक खेळाडूंचा या स्पर्धेत सहभागी होणार असून त्यात नाशिकच्या १३ वर्षाखालील मुलींच्या गटाचे महाराष्ट्राची प्रथम मानांकन असणारी केशिका पूरकर, १९ वर्षाखालील मुलींच्या गटात प्रथम मानांकित स्वरा करमरकर असलेल्या टेबल टेनिसपटूंचा सहभाग आहे. या स्पर्धेत प्रमुख पंच म्हणून रोहित शिंदे तर उप प्रमुख पंच म्हणून गौरव फणसाळकर काम पाहणार आहेत. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील एकूण १६ टेबल पंच म्हणून काम पाहणार आहेत. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आ. सीमाताई हिरे, आ. देवयानी फरांदे, नासिक जिमखाना, नामको बँक, विश्वास बँक, मुकुंद कुलकर्णी, रोशन खटोड, वैभव जोशी, आकाश मोदी आदींचे विशेष सहकार्य लाभले आहे.
स्पर्धेचा उद्घाटन समारंभ शनिवार दि. २० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०. १५ वाजता नासिक जिमखाना येथे, आमदार सौ. सीमाताई हिरे व आमदार सौ. देवयानी फरांदे यांच्या शुभहस्ते होणार आहे. या प्रसंगी क्रीडाप्रेमी व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. पाच दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत कुठलेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. असे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नासिक जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, उपाध्यक्ष व चेअरमन समन्वयक कमिटी शेखर भंडारी, ऑर्गनायझिंग सेक्रेटरी राजेश भरवीरकर, कोषाध्यक्ष अभिषेक छाजेड, मिलिंद कचोळे, सौ. अलका कुलकर्णी, संजय वसंत, अलीअसगर आदमजी, सुहास आगरकर, जय मोडक, पुनीत देसाई अजिंक्य शिंत्रे, राजा आहेर, धनंजय बर्वे, स्वाती आगरकर आदी प्रयत्नशील आहेत.

























