नाशिक – विशेष प्रतिनिधी
राज्य सरकारच्या प्रतिष्ठित “महाराष्ट्र मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२५” मध्ये नाशिकची साक्षी उगले यांची निवड झाली आहे. राज्यभरातून हजारो अर्जदारांमधून अनेक फेऱ्यांतील कठीण स्पर्धा पार करून त्या अंतिम ६० फेलोंपैकी एक ठरल्या आहेत. हा कार्यक्रम राज्य शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणी, मूल्यांकन व धोरणनिर्मितीत सहभागी होण्याची थेट संधी देतो.
साक्षीचे शिक्षण १०वीपर्यंत नाशिकमधील आर.जे.सी.बी. गर्ल्स हायस्कूलमध्ये मराठी माध्यमातून झाले. त्यानंतर त्या फर्ग्युसन महाविद्यालयात दाखल झाल्या. यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊस (NIRF Rank 1) या देशातील सर्वोत्तम महाविद्यालयांपैकी एका ठिकाणी राजकीय शास्त्रात ऑनर्स पदवी घेतली. पुढे त्यांनी जगप्रसिद्ध जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU), नवी दिल्ली येथून आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. शिक्षणासोबतच त्यांनी NITI Aayog, Oxfam, Idinsight, National Human Rights Commission (NHRC) यांसारख्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये संशोधन सहकार्य केले आहे.
साक्षी यांचे हे यश नाशिकसाठी अभिमानास्पद असून, तरुणांना समाजासाठी भरीव योगदान देण्याची प्रेरणा देणारे आहे. साक्षी ही शिवसेना सहसंपर्क प्रमुख गणेश कदम यांच्या भाची आहेत.

























