नाशिक – विशेष प्रतिनिधी
शहरात नवरात्रोत्सवाची धूम सुरू असतानाच सातपूरमधील श्रमिक नगर परिसरात किरकोळ वादातून एका युवकाची धारदार शस्त्राचे वार करून हल्ला करण्यात आल्याची घटना बुधवारी रात्री उशिरा घडली. याप्रकरणी सातपूर पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगदीश परशराम वानखेडे असे त्या मृत युवकाचे नाव आहे. श्रमिकनगर येथील जनार्दन स्वामी नगरमधील १०० फुटी रोडवर बुधवारी रात्री हा हल्ला झाला झाला. गाडी साईडला घेण्याच्या कारणावरून हा प्रकार घडल्याचे समजते. आठ ते दहा जणांच्या टोळक्याने वादानंतर जगदीशवर धारदार शस्त्राने वार केले. या घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. प्राणघातक हल्ल्यात जगदीश हा गंभीर जखमी झाल्याने त्यास तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यास तपासून मयत घोषित केले. नवरात्र उत्सवाच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

























