नाशिक – विशेष प्रतिनिधी
मॅक्स लाईफ पॉलिसीची वैधता पूर्ण झाल्याने त्याचे पैसे मिळवून देण्याचा बहाणा करत टॅक्स भरण्याच्या बहाण्याने येवल्यातील पॉलिसी धारकाला ३३ लाखांहून अधिक रक्कमेला फसवणाऱ्या भामट्यास ग्रामीण पोलिसांच्या सायबर शाखेने उत्तर प्रदेशातून जेरबंद केले आहे. फसवणुकीच्या रक्कमेतील दोन खात्यातील सहा लाख रुपये गोठवण्यातही पोलिसांना यश आले आहे.
याबाबतचे अधिक वृत्त असे की, दिलीप सुकदेव जानराव (रा. येवला) यांच्या मॅक्स लाईफ पॉलिसीची वैधता पूर्ण झाल्याचे सांगून त्याचे पैसे मिळवून देतो असे सांगणारा फोन भामट्याने केला. त्याची पूर्तता करण्यासाठी तसेच टॅक्स भरण्याच्या बहाण्याने भामट्याने वेळोवेळी पैसे मागितले. एकूण ३३ लाख ३९ हजार ४१८ रुपये पाठवूनही पॉलिसीची रक्कम न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे जानराव यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ ग्रामीण पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्यात यासंदर्भातील गुन्हा नोंदवला.
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी यातील व्यवहारांची माहिती घेत सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांना तपासाचे निर्देश दिले. मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिगंबर थोरात, हवालदार प्रमोद जाधव, पोलीस नाईक परिक्षीत निकम, खालकर यांनी गुन्हयातील बँक खाते व फसवणुक करणाऱ्या व्यक्तिंचा माग काढण्यास सुरूवात केली. त्यासाठी तांत्रिक विश्लेषण विभागातील हवालदार हेमंत गिलबिले व प्रदीप बहिरम यांचे सहकार्य लाभले. त्यामुळे संशयित हा उत्तर प्रदेशातील लोणी (जि. गाजियाबाद) येथील मोहम्मद अफताब दिलशाद मोहम्मद असल्याचे निष्पन्न झाले. सापळा रचून त्यास अटक केल्यानंतर जानराव यांच्या फसवणुकीतील रक्कमेपैकी दोन खात्यात असलेले सहा लाख २८१ रुपये गोठवण्यात यश आले. तसेच या भामट्याने केलेल्या इतर गुन्ह्यांचेही पुरावे हाती लागले आहेत.
————————————————————–
नागरिकांना आवाहन, NCCRP पोर्टल व सायबर हेल्पलाईन १९३०/१९४५ यावर तात्काळ तक्रार करावी….
नाशिक ग्रामीण पोलिसांनी जिल्हयातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, आपण अनोळखी फोन कॉल्सवर विश्वास ठेवून आपल्या बँक खात्याची वैयक्तीक माहिती अनोळखी व्यक्तीस देवू नये. कोणतीही बँक अशा प्रकारची माहिती फोनव्दारे विचारत नाही. बँक खात्याविषयी माहितीकरीता संबंधित बँकेच्या शाखेत जावुन खात्री करावी. तसेच फोनवर पाठविण्यात आलेल्या अनोळखी लिंक विषयी माहिती नसल्यास क्लिक करू नये. आपल्या बरोबर अशी कोणत्याही प्रकारची फसवणुक झाल्यास लागलीच जवळील पोलीस स्टेशनला किंवा सायबर पोलीस स्टेशनला संपर्क साधावा. संपर्क क्रमांक ०२५३-२२००४०८

























