– आयारामांमुळे निष्ठावंत सापडले अडचणीत…
पंचवटी : सुनील बुनगे
महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना जाहीर झाली त्यामुळे इच्छुक मंडळी आता आरक्षणाची वाट बघत असून जसजशी निवडणुक जवळ येत आहे तसतसे इच्छुक उमेदवार वाढत आहे. त्यातच
केंद्र व राज्यात सत्ता असणाऱ्या भारतीय जनता पक्षात ‘ट्रीपल इंजिन’ मध्ये बसण्यासाठी आयारामांची संख्या आहे. मात्र त्यामुळे भाजपसाठी जोडे झिजवलेल्या इच्छुकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. त्यामुळेच की काय आता भाजपसाठी खऱ्या निष्ठावंतांकडून आता सोशल मीडियावरून मतदारांना ‘सोबत असाल तर लाईक करा अन् साथ द्या’, अशी साद घातली जात आहे.
प्रभाग रचना जाहीर होताच इच्छुक मंडळी सक्रिय होऊ लागली आहे. अनेकजण अनाधिकृत फलकांद्वारे चमकोगिरी करून शहराचे विदृपीकरण करत आहेत. तर अनेकजण आता सोशल मीडियाद्वारे सक्रिय झाले आहेत. त्यातच भाजप अन् दोन शिवसेना एक ठाकरेंची अन् दुसरी शिंदेंची तर दोन राष्ट्रवादी एक शरद पवारांची अन् दुसरी अजित पवारांची, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस असे अनेक पक्ष झाले आहेत. त्यामुळे इच्छुकांची संख्या ही तितकीच वाढली आहे. निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडी मध्ये होईल की नाही हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
त्यातच शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती जवळपास निश्चित होत असल्याने येणाऱ्या निवडणुकीत मोठी रंगत वाढणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
या पार्श्वभूमीवर,गेल्या काही दिवसांत भारतीय जनता पक्षात आयारामांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तर दुसरीकडे भाजपसाठी अनेकांनी आपले आयुष्य खर्ची घातले असल्याने येणाऱ्या निवडणुकीत भाजप समोर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित राहणार आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन भाजप मध्ये आलेल्यांना पक्षाच्या नेत्यांनी कुठल्या आश्वासनावर पक्षात प्रवेश दिला हे जरी आज स्पष्ट झाले नसले तरी पक्षाच्या निष्ठावंताना मात्र देव पाण्यात बुडून बसवायला लागणार आहेत. म्हणूनच की काय अनेक निष्ठावंतांनी आता सोशल मीडियाच्या माध्यमातून साद घालायला सुरुवात केली आहे. त्यामुळे जसजशी निवडणूक येत जाईल तसतसे पुढे काय होईल याकडे मात्र आता सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

























