मुंबई –
‘कांटा लगा हाय लगा…’ या गाण्याच्या रिमिक्समुळे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेली शेफाली जरीवाला हिचे वयाच्या ४२ व्या वर्षी शुक्रवारी रात्री उशिरा मुंबईत निधन झाले. शेफाली ही अभिनेता सलमान खानसोबत ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटातही चमकली होती. शेफालीच्या अकाली व आकस्मिक निधनामुळे चित्रनगरीत उलटसुलट चर्चा होत आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री छातीत दुखत असल्यामुळे पती पराग त्यागी शेफालीला घेऊन रुग्णालयात गेला. मात्र तपासणीअंती डॉक्टरांनी शेफालीला मृत घोषित केले. नव्वदीच्या दशकात ‘कांटा लगा हाय लगा…’ या गाण्याच्या रिमिक्समुळे शेफाली ही एका रात्रीत प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली. त्यानंतर तिने ग्वाल्हेर येथील गायक व संगीतकार तसेच मीत बदर्सपैकी एक असलेल्या हरमीत गुलजार यांच्याशी प्रेमविवाह केला होता. काही काळानंतर विभक्त झाल्यानंतर शेफालीने पराग त्यागीसोबत दुसरा विवाह केला. परागसोबत शेफाली ही ‘नच बलिए’ मध्ये सहभागी झाली होती. ‘बिग बॉस’ च्या १३ व्या हंगामातही ती सहभागी झाली होती. ‘कार्डियाक ॲरेस्ट’ मुळे शेफालीचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.

























