नाशिक – विशेष प्रतिनिधी
शहरातील कर्तव्यदक्ष नगरसेविका स्व. सौ सुरेखाताई रमेश भोसले यांच्या जयंती निमित्त रविवार कारंजा येथे सोमवारी स्व. सौ सुरेखाताई भोसले सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने तुळशी रोपांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. उपस्थित नागरिकांनी स्वर्गीय सुरेखाताईंच्या जनसेवेच्या कार्याला उजाळा दिला आणि त्यांच्या योगदानाला आदरांजली वाहिली.
स्व. सुरेखाताईंच्या कार्याची आठवण करून देत, नागरिकांनी या तुळशी वाटपाच्या उपक्रमाचे कौतुक केले. विशेषतः सुरेखाताईंच्या स्नुषा सौ. रश्मी सचिन भोसले यांनी सुरेखाताईंना अपेक्षित असलेले कार्य पुढे नेल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी बोलताना सौ. रश्मी सचिन भोसले यांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचा आपला निर्धार व्यक्त केला. त्या म्हणाल्या, ‘आम्ही या पुढेही अशा सामाजिक कार्यात सक्रिय राहू आणि सुरेखाताईंनी सुरु केलेला जनसेवेचा वारसा सदैव पुढे चालू ठेवू’. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेख हास्य क्लब आणि सुरेख भजनी मंडळ यांच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा स्तुत्य उपक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.





























