सुरेखाताई भोसले निवासी प्रबोधिनीच्या खेळाडू…
नाशिक – क्रीडा प्रतिनिधी
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने १४ वर्षा आतील नाशिक महानगर स्तरीय मुलींच्या खो-खो स्पर्धेचे आयोजन विभागीय क्रीडा संकुल, पंचवटी येथे आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेत नाशिक महानगर परिसरातील एकुण ४३ संघ सहभागी झाले होते. अंतिम फेरीत शासकीय कन्या शाळेने र.ज.चव्हाण हायस्कूल (नाशिकरोड) संघांचा एक डाव आणि १० गुणांनी दणदणीत पराभव करुन विजयाला गवसणी घातली.
सामन्याच्या मध्यांतरला विजेत्या संघाकडे १२ विरुद्ध ० अशी १२ गुणांची अजेय आघाडी होती. पहिल्या सामन्यापासून अंतिम फेरी पर्यंत शासकीय कन्या शाळेने सर्व सहा सामने हे डावाच्या फरकाने जिंकून या स्पर्धेतील आपले प्रभुत्व सिद्ध केले. या विजयात गायत्री पेंढार, सृष्टी शिंदे, वर्षा गायकवाड, साक्षी जाधव, नूतन जाधव यांनी आपल्या संघांच्या एकतर्फी विजयात मोलाचा वाटा उचलला. त्यांना संभवी शिंदे, कामिनी भुसारे, श्रद्धा गाडेकर,राधिका काकडे, पायल शिंदे, गायत्री मोरे, एकता सगर यांनी उर्वरीत स्पर्धेत चांगला खेळ केला.
स्पर्धेतील विजेता शासकीय कन्या शाळेचा संघ विभागीय खो-खो स्पर्धेत नाशिकचे प्रतिनिधित्व करणार आहे. सलग आठव्या वर्षी शासकीय कन्या शाळेचा संघ विभागीय खो-खो स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. विजेत्या खेळाडू ह्या नाशिक जिल्हा खो-खो असोसिएशन संचलित स्व. सौ सुरेखाताई भोसले निवासी खो-खो प्रबोधिनीच्या खेळाडू आहेत. नाशिक जिल्हा खो-खो असोसिएशन संचालित छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे सकाळ आणि सायंकाळ अशा दोन सत्रात गीतांजली सावळे आणि उमेश आटवणे यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करत असतात.

























