– ग्रामीण पोलीसांची धडक कारवाई.
– ६,१२५ जिलेटीनच्या कांडया,
– २२०० इलेक्ट्रीक डेटोनेटर,
– १५० मीटर डी. एफ. वायर हस्तगत.
नाशिक – विशेष प्रतिनिधी
मुंबई महामार्गावरील वाडीवऱ्हे नजिकच्या सारूळ गावच्या शिवारात विनापरवाना बाळगलेल्या ६, १२५ जिलेटीनच्या कांडया, २२०० इलेक्ट्रीक डेटोनेटर, १५० मीटर डी. एफ. वायर असा साठा जप्त करण्यात आला आहे. वाडीवऱ्हे पोलीस व अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या पथकाने संयुक्त कामगिरी करत स्फोटकांचा साठा जप्त केल्याने संभाव्य अनर्थ टळला आहे.
याप्रकरणी गोरख बाजीराव ढगे (वय ३४), विकास नवले, ओंकार कैलास नवले (वय २३, तिघेही रा. सारूळ), दिपक दशरथ क्षिरसागर (वय ३२, रा. शिंगवे बहुला, देवळाली कॅम्प), गौरव मोहन नवले (वय ३२, रा. सारूळ) यांच्यासह अमित अजमेरा व कोठावदे यांच्याविरुद्ध वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १२५, २८४, २८८ सह भारतीय स्फोटक कायदा १८८४ चे कलम ५ चे उल्लंघन ९ ब (१) (ब), ९ ब (१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतचे अधिक वृत्त असे की, नाशिक ग्रामीण जिल्हयातील अवैध व्यवसायांचे समुळ उच्चाटन व गुन्हेगारी कारवायांना प्रतिबंध होण्यासाठी, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशान्वये पोलीस ठाणेनिहाय कारवाई करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने अपर अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांना मिळालेल्या गुप्त बातमीप्रमाणे वाडीवऱ्हे पोलीस ठाणे हद्दीत सारूळ शिवारात अवैधरित्या जिलेटीनचा साठा
असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार एक सप्टेंबर रोजी वाडीवऱ्हे ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे व पोलीस अधीक्षक कार्यालयातील सहायक निरीक्षक दिनकर मुंडे यांच्या पथकाने लागलीच श्वान पथक आणि बॉम्ब शोधक व नाशक पथक यांच्यासह पंचासमक्ष छापा टाकला. सारूळ गावचे शिवारात संशयितांचे राहत्या घराचे पाठीमागील बाजूस तसेच पत्र्याचे शेडमध्ये अमोनियम नायट्रेट युक्त असलेल्या जिलेटीन सारखे स्फोटक पदार्थांच्या कांड्या भरलेले बॉक्स आणि डेटोनेटर एकत्रित रित्या निष्काळजीपणे मिळून आले.
संशयितांनी जिलेटीन सारख्या स्फोटक पदार्थांच्या कांडया भरलेले बॉक्स यांच्या संपर्कात डेटोनेटर आल्यास भयंकर विस्फोट होऊन इतरांचे जिवित किंवा व्यक्तिगत सुरक्षा धोक्यात येईल किंवा कोणत्याही व्यक्तीस दुखापत किंवा क्षति पोहचू शकते हे माहित असतांना देखील अमोनियम नायट्रेट युक्त असलेल्या जिलेटीनच्या कांड्या भरलेले बॉक्स आणि डेटोनेटर एकत्रितरित्या निष्काळजीपणाने ठेवलेले आढळले. स्फोटके घरात व शेडमध्ये ठेवण्याचा त्यांचेकडे कोणताही अधिकृत परवाना नाही हे माहित असतांना देखील त्यांनी अमोनियम नायट्रेट युक्त असलेल्या जिलेटीनच्या कांडया भरलेले बॉक्स आणि डेटोनेटर तसेच डी. एफ. वायर असे एकत्रितरित्या निष्काळजीपणाने कब्जात बाळगतांना मिळून आले. यातील अजमेरा व कोठावदे यांना मुद्देमाल सुरक्षितरित्या हाताळणाऱ्या प्रशिक्षित इसमाने काम झाल्यानंतर उर्वरित स्फोटके हे मॅग्झिनमध्ये सुरक्षितरित्या ठेवणे बंधनकारक असते हे माहित असतांना देखील स्फोटके इतर पाच जणांच्या ताब्यात असुरक्षितरित्या ठेवल्याचे आढळून आले.
संशयितांच्या कब्जातून विनापरवाना असुरक्षितरित्या कब्जात बाळगलेले अमोनियम नायट्रेट युक्त असलेल्या जिलेटीनच्या कांड्या भरलेले ४९ बॉक्स त्यात एकुण ६, १२५ जिलेटीनच्या कांडया, २२०० इलेक्ट्रीक डेटोनेटर, १५० मीटर डी. एफ. वायर असा एकुण ९५,७५०/- रू. किंमतीचा साठा मिळून आला आहे. सदर आरोपीतांना वाडीव-हे पोलीस ठाणेकडील वरील गुन्हयात अटक करण्यात आली असून पुढील तपास वाडीव-हे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. भगवान मथुरे यांचे पथक करीत आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, पोलीस अधीक्षक कार्यालयाकडील सहायक निरीक्षक दिनकर मुंडे, उपनिरीक्षक अमोल सूर्यवंशी, नाशिक तालुका ठाण्याचे उपनिरीक्षक एकनाथ भोईर, वाडीवऱ्हे येथील उपनिरीक्षक सुनिल शिंदे, पोलीस अंमलदार सुभाष धुळे, रावसाहेब शिंदे, जालिंदर खराटे, सचिन पिंगळ, सचिन कदम, तुषार कापडणीस, रविराज जगताप यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली आहे.

























