नाशिक – क्रीडा प्रतिनिधी
येथील जिमखान्यात खेळवल्या गेलेल्या केशिका पुरकर चौथ्या महाराष्ट्र राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत १७ वर्षाखालील मुलांच्या एकेरीचा पुण्याचा इशान खांडेकर तर मुलींच्या एकेरीत पुण्याची नायशा रेवासकर विजेते ठरले.
चौथ्या मानांकित असलेल्या इशान खांडेकर याने उपांत्य फेरीत प्रथम मानांकित मुंबईच्या पार्थ मगर चा ३-१ ने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. ईशानने पहिला गेम ६-११ गमावला. परंतु अत्यंत आक्रमक खेळ करत पुढील तीन गेम ११-९, ११-७, ११-६ असे जिंकून अंतिम फेरीचे लक्ष गाठून खळबळ उडवून दिली. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ठाण्याच्या अकरावे मानांकन असलेल्या प्रतीक तुलसानी याने पुण्याच्या दहावे मानांकन असलेल्या रामानुज जाधव चा ११-९, ११-५, ११-८ असा सहज पराभव करून अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात इशान खांडेकर ने ठाण्याच्या प्रतीक तुलसानीचा अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत ३-२ ने पराभव करून विजेतेपद मिळवून सुवर्ण पदक पटकावले. दोघांनी पहिले दोन दोन गेम जिंकून बरोबरी करत पाचव्या निर्णायक गेममध्ये अत्यंत आक्रमक खेळ करत निर्णायक क्षणी इशान खांडेकर याने दोन गुण मिळवित १३-११ असा गेम जिंकून विजयावर शिक्कामोर्तब केले.
ठाण्याच्या बिगर मानांकित वैदेही ठाकरे हिने ठाण्याच्या प्रथम मानांकित सुक्रती शर्माचा अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यामध्ये ३-२ असा पराभव करून सर्वांना आश्चर्यचकित केले. पाच गेम पर्यंत चाललेला या सामन्यात पहिला गेम ११-८ असा जिंकून वैदेहीने आपला इरादा स्पष्ट केला. परंतु पुढील दोन गेम ११-४, ११-७ असे जिंकून सुक्रतीने जिंकून २-१ ने आघाडी घेतली. चौथा गेम वैदेहीने ११-७ जिंकून बरोबरी साधली. पाचवा गेम अत्यंत चुरशीने खेळला गेला. शेवटी हा गेम १४-१२ असा जिंकून वैदेहीने अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पुण्याच्या नायशा रेवासकरने नाशिकच्या दुसरी मानांकित स्वरा करमरकरचा ११-५, ११-९, ९-११, ११-६ असा ३-१ ने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात पुण्याच्या नायशा रेवासकरणे अंत्यंत सहजरित्या ठाण्याच्या वैदेही ठाकरेचा ११-४,११-९, ९-११, ११-६ असा ३-१ ने पराभव करून विजय मिळवीत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले
स्पर्धेचा बक्षीस समारंभ जिल्हा क्रीडाधिकारी श्रीमती सुनंदा पाटील, कु. रुचिता ठाकूर व तालुका क्रीडाधिकारी अविनाश टिळे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. विजेत्या खेळाडूंना रोख पारितोषिक व चषक देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी व्यासपीठावर नासिक जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, राज्य टेबल टेनिस संघटनेचे जनरल सेक्रेटरी यतिन टिपणीस, संजय कडू, महेंद्र चिपळूणकर, अशोक राऊत, प्रकाश जसानी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन शेखर भंडारी यांनी केले. याप्रसंगी पालक व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो कॅप्शन : विजयी खेळाडूंसोबत प्रमुख पाहुणे श्रीमती सुनंदा पाटील, अविनाश टिळे, कु. रुचिता ठाकूर, नरेंद्र छाजेड, यतिन टिपणीस, शेखर भंडारी, अभिषेक छाजेड, संजय कडू, महेंद्र चिपळूणकर, अशोक राऊत, प्रकाश जसानी.

























