मुंबई –
पुरोगामी महाराष्ट्राने अंधश्रद्धा निर्मूलनचा कायदा संमत केलेला असतानाही कथित अघोरी पूजेमुळे वादात सापडलेले मंत्री भरत गोगावले यांची अडचण वाढण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते सूरज चव्हाण यांनी गोगावले यांचा मांत्रिकासोबतचा दुसरा व्हिडिओ ‘एक्स’ वर टाकला आहे. बाबा भरतशेठ + अघोरी विद्या = पालकमंत्री ?, असा शीर्षकाखाली प्रसारीत करण्यात आलेल्या या व्हिडिओमुळे खळबळ उडाली आहे.
महायुतीतील मित्रपक्षातील म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी ‘एक्स’ वर टाकलेल्या या व्हिडिओने रायगडच्या पालकमंत्री पदासाठी हा सर्व खटाटोप सुरू असल्याचे सूचित करण्यात आले आहे. या व्हिडिओमध्ये ना. गोगावले यांच्या अंगावर फक्त कमरेला टॉवेल गुंडाळलेला असून ते तिघा मांत्रिकासमवेत असल्याचे दिसून येत आहे.

रायगड व नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी महायुतीतील तीनही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असून त्यातील रायगडसाठी तर अघोरी पूजेचा घाट घालण्यात आल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे ना. गोगावले यांच्याविरुद्ध अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वये कारवाई करण्याची मागणी होत आहे.
विशेष म्हणजे मंत्री भरत गोगावले यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी आपल्या घरात अघोरी पूजा केल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी अलीकडेच होता. या प्रकरणी त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार करण्याचाही इशारा दिला आहे.
https://x.com/surajvchavan/status/1935338684511109279?t=IVCkRJuftMrWxxmJobWwWA&s=19

























