नाशिक – विशेष प्रतिनिधी
भुताळीण आहे, भुताळपणा लावते या रागातून ६२ वर्षीय काकूचा कुऱ्हाडीने वार करत जीवे ठार मारल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपी योगेश किसन वड या पुतण्यास जन्मठेप व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती के.के. पाटील यांनी हा निकाल दिला. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता सुलभा सांगळे यांनी पुरावा सादर करत आरोपीस शिक्षेप्रत पोहचवले. मयत छबीबाई (वय ६२) हिची १० वर्षीय नात हिच्यासह सात जणांनी साक्ष दिली.
अभियोग कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, ३० जानेवारी २०२३ रोजी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रायते पैकी बेलीचा पाडा येथे रात्री १० वाजता ही घटना घडली होती. काकू छबीबाई वड भुताळीण असून भुताळपणा करते अशा गैरसमजातून पुतण्या योगेश याने काकूच्या घरासमोरच तिच्या डोके, पाठ, मान, कंबर तसेच दोन्ही पायांच्या गुडघ्यावर कुऱ्हाडीने वार केले. यात छबीबाई हिचा मृत्यू झाला. तिचा मुलगा भावराव पांडु वड याच्या तक्रारीनुसार हरसुल पोलिसांनी भादंवि कायदा कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंदवला होता. सहायक निरीक्षक एन.ई. बोडखे यांनी सखोल तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. सहायक उपनिरीक्षक के.के. भोये यांनी पैरवी केली.

























