नाशिक – विशेष प्रतिनिधी
नवरात्र उत्सव निर्विघ्नपणे संपन्न होत असताना विजयादशमीला पहाटे नाशिकरोडमध्ये टवाळखोरांनी चार कारच्या काचा फोडत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी याबाबत कळवल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यातील टवाळखोरांचा माग काढला जात आहे.
नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे ४.३० ते पाच वाजेदरम्यान ही घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या तीन टवाळखोरांनी हे कृत्य केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असून राजवाडा, धोंगडे मळा, डावखर वाडी येथील चार कारची नासधूस करण्यात आली. काचा फोडल्याचा आवाज येताच नागरिकांना जाग आली. तोपर्यंत टवाळखोर पळून गेले होते. जयभवानी रोडवर वास्तव्यास असणारे सामाजिक कार्यकर्ते व शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख विक्रम कदम यांनी तात्काळ उपनगर पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर उपनिरीक्षक सोनवणे हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. यासंदर्भात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस टवाळखोरांचा माग काढत आहे.

























