– पोलीस ठाणेनिहाय राबवणार ‘कोम्बिंग अॉपरेशन’…
नाशिक – विशेष प्रतिनिधी
शहरातील वाढती गुन्हेगारी तसेच खुनासारख्या गंभीर घटना टाळण्यासाठी शहर पोलीस दलातर्फे पोलीस ठाणेनिहाय ‘कोम्बिंग अॉपरेशन’ राबविण्यात येणार आहे. त्यानुसार मंगळवारी सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या विशेष मोहिमेत ९२ टवाळखोरांना ताब्यात घेत त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हे शाखेचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त संदीप मिटके, शेखर देशमुख यांच्यासह वरिष्ठ निरीक्षक रणजित नलवडे, सहायक निरीक्षक माळी, हेमंत तोडकर, मोहिते, पाटील यांच्या नेतृत्वाखाली मध्यवर्ती गुन्हे शाखा, गुन्हे शाखा युनिट-२, गुंडा विरोधी पथक, सायबर पोलिस स्टेशन, विशेष शाखा, अंमली पदार्थ विरोधी पथक, सातपूर पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथक असे प्रत्येक शाखांचे ०१ अधिकारी व १० अंमलदार तसेच अशांनी संपूर्ण सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी सायंकाळी सात ते रात्री ११ दरम्यान विशेष मोहीम राबवली. त्यात रस्त्यावर दारू पिणारे, टवाळखोर, ट्रिपल शीट वाहन चालविणारे तसेच मोकळ्या मैदानात बसून दारू पिणारे अशा ९२ जणांना ताब्यात घेण्यात आले. पोलिस ठाण्यात आणून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

























