नाशिक – विशेष प्रतिनिधी
शहरातील प्रख्यात आयुर्वेद सेवा संघाच्या गणेशवाडी येथील औषधी भवनाच्या पॕकींग मटेरियल विभागात प्रवेश करून चोरट्यांनी लोगो असलेले औषधी बाटल्यांचे अॕल्युमिनियम झाकणाचे आठ बॉक्स पळवले होते. याप्रकरणी बनावटीकरणाचा धोका लक्षात घेऊन पंचवटी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने वेगाने तपास करत तिघांना मुद्देमालासह जेरबंद केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयुर राजाराम जाधव (वय ३०, रा. रो हाऊस नं-१६, साई रो हाऊस हिरावाडी, पाटाजवळ, पंचवटी), जितेष उर्फ गुड्डु चिंतामण फसाळे (वय-२१), संदिप छोटुलाल कनोजिया (वय-२५, दोघेही रा.ठि. गणेशवाडी मुंजाबा चौक, पंचवटी) अशी संशयितांची नावे आहेत.
गणेशवाडीतील आयुर्वेद सेवा संघ संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असून त्यांची औषधेही प्रख्यात आहे. चोरट्यांनी औषधी भवनाच्या स्टोअरमागील खिडकीच्या काचा काढून आत प्रवेश केला. त्यातील लोगो असलेले औषधी बाटल्यांचे अॕल्युमिनियम झाकणाचे ५१ हजार रुपये किंमतीचे आठ बॉक्स पळवले होते. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर संभाव्य प्रकार टाळण्यासाठी तपासाला वेग आला. गुन्हे शोध पथकातील कुणाल पचलोरे यांना गुप्त बातमीदाराकडून यातील संशयितांची माहिती मिळाली. तेव्हा पथकाने तातडीने कारवाई करत तिघा संशयितांना मुद्देमालासह जेरबंद केले.
पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त संगिता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहायक निरीक्षक
सतिश शिरसाठ, सहायक उपनिरीक्षक संपत जाधव, हवालदार शिंदे, महेश नांदुर्डीकर, काळे, अंमलदार लोणारे, गायकवाड, कुणाल पचलोरे, अंकुश काळे, परदेशी, बहिकर, वायंकडे, चितळकर, पवार, श्रीमती शिंदे यांनी ही कामगिरी बजावली आहे.

























