नाशिक – विशेष प्रतिनिधी
राज्य शासनाने भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) आठ पोलीस अधिकाऱ्यांना समयश्रेणीत पदोन्नती देऊन त्यांनी पदस्थापना दिली होती. त्यातील तीन अधिकाऱ्यांना दिलेल्या पदस्थापनेत बदल करण्यात आला असून नांदेड येथील किरितिका सी एम यांची आता नाशिक शहराच्या पोलीस उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.
शहर पोलीस आयुक्तालयातील उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव व उपायुक्त (प्रशासन) चंद्रकांत खांडवी यांची नुकतीच बदली झाली होती. त्यानंतर शहरात कोण अधिकारी येणार याबाबत उत्सुकता होती.
नांदेड येथे पोलीस उपअधिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या किरितिका सी एम यांची पोलीस उपायुक्त, अमरावती शहर तर सावनेर (नागपूर) येथील उपविभागीय अधिकारी अनिल म्हस्के यांची उपायुक्त, नाशिक शहर अशी बदली करण्यात आली होती. परंतू आता या यादीत बदल करण्यात आला आहे. किरितिका सी एम यांची नाशिक शहरात तर अनिल म्हस्के यांची नागपूर ग्रामीणच्या अपर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. किरितिका सी एम या मुळच्या तामीळनाडू येथील असून २०२० मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत त्यांनी ३८२ वी रँक प्राप्त केली होती.

























