नाशिक – विशेष प्रतिनिधी
शहरातील प्रमुख रस्त्यांची अवस्था सध्या अत्यंत भयावह बनली असून, प्रत्येक प्रभागात
ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. पावसामुळे खड्ड्यांत पाणी साचल्याने नागरिकांना हे खड्डे ओळखता येत नाहीत, त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी नागरिक जखमी झाले असून काही ठिकाणी गंभीर घटनाही घडलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने ‘सेल्फी विथ खड्डा’ हे अभिनव आंदोलन हाती घेतले आहे.
नाशिक रोड, पंचवटी, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, सिडको, सातपूर या सर्व महापालिकेच्या विभागीय कार्यालयांच्या हद्दीतील प्रमुख रस्त्यांची ही स्थिती नाशिककरांमध्ये संतापाची लाट निर्माण करत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने ‘सेल्फी विथ खड्डा’ या अभिनव आंदोलनाची सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती शिवसेना नाशिक जिल्हा सचिव मसूद जिलानी यांनी दिली आहे.
या आंदोलनाअंतर्गत नागरिकांनी आणि पक्षातील कार्यकत्यांनी आपल्या परिसरातील खड्ड्यांबाबत जागरुकता निर्माण करावी, असे आवाहन शिवसेनेचे उपनेते दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, महानगर प्रमुख प्रथमेश गीते, माजी आमदार व माजी महापौर वसंत गीते, राज्य संघटक विनायक पांडे आणि सर्व उपजिल्हाप्रमुख व विधानसभा प्रमुख यांनी केले आहे.
सर्व शहरातील शिवसेना पदाधिकारी विभाग प्रमुख आणि प्रभाग प्रमुख यांना सूचित करण्यात आले आहे की त्यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांना सोबत घेऊन, प्रमुख रस्त्यांवरील खड्ड्यांसमोर ‘सेल्फी’ काढून तो फोटो व माहिती #Selfie With Khadda, #NashikKhaddaAndolan, #SmartCity? #नाशिकमहानगरपालीका अशा हॅशटॅगसह सोशल मीडियावर पोस्ट करावी.
हे संकलन केल्यानंतर महापालिकेकडे अधिकृतपणे सादर करून, रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत उत्तरदायित्वाची मागणी केली जाईल. जर लवकरात लवकर खड्डे बुजवण्याची ठोस कारवाई झाली नाही, तर राजीव गांधी भवनवर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.

























