नाशिक – विशेष प्रतिनिधी
आषाढ वारीच्या निमित्ताने त्रंबकेश्वर येथून श्री. संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी दिंडीचा रथसोहळा १० जुन रोजी प्रस्थान झाला. यावेळी सोहळयासाठी जमलेल्या भाविकांचे गर्दीचा फायदा घेवुन ३,१६,८००/- रू. किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेला होता. याबाबत तक्रारी आल्यानंतर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने कौशल्याने तपास करून टाकळीतील दाम्पत्यास जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश अशोक राखपसरे (वय २४) व त्याची पत्नी निशा मंगेश राखपसरे (वय २५, रा. टाकळी गाव, नाशिक) अशी आरोपींची नावे आहेत. पालखी सोहळा तसेच बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन महिलांचे दागिने चोरीला गेल्याप्रकरणी त्रंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपासास प्रारंभ केला. गुन्हा करण्याची पध्दत व घटनास्थळांवर मिळून आलेल्या तांत्रिक पुराव्यांचे अचूक विश्लेषण करून मिळविलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे
राखपसरे दाम्पत्याला ताब्यात घेण्यात आले.
दोघांची सखोल चौकशी केली असता त्यांनी गत आठवडयात त्रंबकेश्वर येथे जावून श्री. संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा व त्रंबक बसस्टॅण्ड परिसरातून भाविकांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी केल्याची कबुली दिलेली आहे. आरोपींनी कबुली दिल्यावरून त्रंबकेश्वर पोलीस ठाणेस वरील प्रमाणे दाखल असलेले चोरीचे ०२ गुन्हे उघडकीस आलेले आहेत. आरोपींचे कब्जातुन वरील गुन्हयात चोरीस गेलेल्या दागिन्यांची मोड करून तयार केलेली ०१ तोळा वजनाची सोन्याची लगड, ९०००/- रू. रोख रक्कम, आयफोन १४ प्रो, ओपो, वन प्लस, सॅमसंग कंपनीचे ०४ मोबाईल फोन, तसेच गुन्हयात वापरलेली यामाहा फसीनो मोटर सायकल असा एकुण ३,००,०००/- रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आरोपी मंगेश अशोक राखपसरे हा सराईत गुन्हेगार असून त्याचेवर यापुर्वी नाशिक शहरातील सरकाखाडा, मुंबई नाका व पंचवटी पोलीस ठाणेस चोरीचे एकुण ०५ गुन्हे दाखल आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर, अंमलदार संदिप नागपुरे, सुशांत मरकड, जालिंदर खराटे, नवनाथ वाघमोडे, सतिष जगताप, प्रविण गांगुर्डे, सचिन पिंगळ, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, ललिता शिरसाठ यांनी ही कामगिरी बजावली आहे.

























