नाशिक – विशेष प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी ओमकार पवार यांची नियुक्ती झाली आहे. तर
सततच्या बदलीमुळे चर्चेत असलेले ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांची पुन्हा बदली झाली आहे. मुंडे यांची आता दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून काम पाहतील. मुंडे यांच्यासह चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले आहेत.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची जालना जिल्हाधिकारी पदी बदली झाल्यानंतर हे पद रिक्त होते. या पदावर आता ओमकार पवार यांची नियुक्ती करण्यात आली असून पवार हे सध्या इगतपुरी उपविभागात सहायक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते.
तुकाराम मुंडे सध्या मुंबईत असंघटीत कामगार विभागात विकास आयुक्त म्हणून कार्यरत होते. महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक नितीन काशिनाथ पाटील यांची राज्य कर विभागात विशेष आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. तर राज्य कर विभागाचे विशेष आयुक्त अभय महाजन आता महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक असतील.

























