नाशिक – विशेष प्रतिनिधी
बनावट शासन निर्णय तयार करून त्याद्वारे
पर्यटन स्थळांच्या पायाभुत सुविधा पुरविण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे भासवून शासनाची एक कोटी रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या
तत्कालीन कार्यकारी अभियंता श्रीमती शैलेजा नलावडे व इतरांविरुद्ध भद्रकाली पोलिसांनी अपहाराचा गुन्हा नोंदवला आहे.
जिल्हा परिषदेचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी प्रदीप रतन अहिरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, जिल्हा परिषदेतील इमारत व दळणवळण विभाग ३ मध्ये ४ डिसेंबर २०२४ ते पाच फेब्रुवारी २०२५ दरम्यान अपहाराचा हा प्रयत्न घडल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. जिल्हा परिषदेतील कार्यकारी अभियंता पदावर काम करणाऱ्या महिला अधिकाऱ्याने शासनालाच चुना लावण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.
श्री. अहिरे यांनी दिलेली फिर्याद व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेतील इमारत व दळणवळण विभाग ३ मध्ये श्रीमती नलावडे या कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असताना इतरांशी संगनमत करून बनावट शासन निर्णय (
क्र. टीडीएस 2024/06/प्र.क. 120/पर्यटन-1 दिनांक 6 ऑगस्ट 2024) तयार केला. त्याद्वारे एक कोटी रूपयांची पर्यटन स्थळांच्या पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे भासवले. हा बनावट शासन निर्णय बेकायदेशीरपणे शासकीय अभिलेखावर नोंदवून खोटे दस्तऐवज तयार करून निविदा भरणाऱ्या इसमांना शासनाच्या एक कोटी रूपयांच्या निधीचा गैरलाभ व्हावा, या उद्येशाने व इतर शासकीय अधिकाऱ्यांची दिशाभूल व फसवणूक करून बेकायदेशीर पणे निविदाप्रकीया राबवून शासनाच्या एक कोटी रूपयांचा निधीचा अपहार करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.
भद्रकाली पोलिसांनी अपहाराचा गुन्हा नोंदवला असून वरीष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) विक्रम मोहीते पुढील तपास करत आहेत.

























