– श्रावण मासानिमित्त भाविकांची गर्दी उसळणार…
– मंदिराला केली आकर्षक विद्युत रोषणाई…
– पंचवटी पोलिसही झाले सज्ज…
पंचवटी – विशेष प्रतिनिधी
श्रावण मासानिमित्त शिवभक्तांना दर्शन घेण्यासाठी, सोमवार आणि शनिवारी कपालेश्वर मंदिर पहाटे ४ ते रात्री १२ वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले राहणार असल्याची माहिती प्रशासक विलास पाटील यांनी दिली. श्रावण महिना सुरू झाल्याने शहर परिसरातील महादेव मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून पंचवटीतील श्री कपालेश्वर महादेव मंदिरात देखील श्रावणानिमित्त मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली आहे.मंदिराची स्वच्छता करून मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून दरवर्षी प्रमाणे होणारी गर्दी लक्षात घेता यंदाही भाविकांच्या सुरक्षेच्या आणि सुरळीत दर्शनाच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.

प्रशासक विलास पाटील
श्रावण मासानिमित्त कपालेश्वर महादेव देवस्थान ट्रस्टच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. श्रावण महिन्यात सोमवार-शनिवार कपालेश्वर मंदिर पहाटे ४ ते रात्री १२ वाजेपर्यंत भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार असून, इतर दिवशी पहाटे पाच ते रात्री अकरापर्यंत उघडे रहाणार आहे. तसेच महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र दर्शन रांगा करण्यात येणार असून बॅरिकेडससह १०० हून अधिक स्वंयसेवकदेखील तैनात राहणार आहेत.
याच बरोबर पंचवटी पोलिस ठाण्याच्या वतीने पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. श्रावणी सोमवार, श्रावणी शनिवार या दिवशी मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या लाखांहून अधिक मोठ्या प्रमाणावर असते. या दरम्यान भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण होवू नये यासाठी कपालेश्वर महादेव देवस्थान ट्रस्टच्या वतीने विशेष नियोजन करण्यात आले आहे. संपूर्ण श्रावण महिना तसेच गणेशोत्सवापर्यंत मंदिरासह परिसरात विद्युत रोषणाई राहणार आहे.
एकवीस दांपत्यांकडून होणार पूजा
श्रावण मासाच्या पहिल्या श्रावणी शनिवारी कपालेश्वर एकवीस दांपत्यांकडून पूजा करण्याची परंपरा आहे. त्यानुसार कपालेश्वर मंदिरात सत्यशंकर पूजेचे आयोजन करण्यात आले आहे या पूजेसाठी एकवीस दांपत्य पूजेसाठी बसणार आहेत.



























