– शिवसैनिक-मनसैनिकांनी दाखवली एकजूट….
नाशिक – विशेष प्रतिनिधी
नाशिक शहर व जिल्ह्यातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ‘ठाकरे ब्रँड’ खऱ्या अर्थाने एकवटल्याचे चित्र शुक्रवारी दिसून आले. खड्डेमय रस्ते, प्रशासनातील भ्रष्टाचार, बेरोजगारीचे आव्हान यासह विविध प्रश्नांसाठी उद्धव ठाकरे यांची शिवसेना व राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भव्य मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधले.


नाशिककरांसाठी शिवसेना (ठाकरे गट) व मनसे यांचा हा पहिलाच मोठा मोर्चा होता. या मोर्च्यामुळे शहरात ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती. शिवसेना नेते संजय राऊत, मनसे नेते बाळा नांदगावकर, आ. सचिन अहिर, खा. राजाभाऊ वाजे, डॉ. प्रदीप पवार, दिनकर पाटील, दत्ता गायकवाड, माजी आ. वसंत गिते, सलिम शेख, डी.जी. सुर्यवंशी, ॲड. रतनकुमार इचम, माजी महापौर विनायक पांडे, जयंत दिंडे, अंकुश पवार, सुदाम कोंबडे, प्रथमेश गिते, सुजाता डेरे, नितीन आहेर, नितीन आहेर, प्रविण नाईक, पवन ठाकरे, निवृत्ती जाधव, केशव पोरजे, भारती ताजनपुरे, मसुद जिलानी, ॲड. संदेश जगताप यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.
शहरात अलीकडेच उघडकीस आलेला हनी ट्रॅप स्कॅम, नाशिककरांची विशेषतः ज्येष्ठ नागरिकांची होत असलेली अॉनलाईन फसवणूक, संकटात सापडलेला शेतकरी, अनाधिकृत सावकारी व फोफावलेले अवैध धंदे, तरूणाईला उद्धवस्त करणारे एम.डी सारख्या विविध अंमली पदार्थांची खुलेआम विक्री, कोयता गँगची वाढती दहशत, रोलेट-बिंगो यासारख्या अॉनलाईन जुगाराचा विळखा, महापालिकेतील भ्रष्ट्राचार, खड्डेमय रस्ते, कुंभमेळ्यासाठी होत असलेल्या कामातील अनागोंदी कारभार, महिला असुरक्षितता, कामगारांचे हिरावून घेतले जाणारे हक्क, वीज कंपनीचे खासगीकरण व स्मार्ट मीटर लादणे, युवकांना भेडसावणारा बेरोजगारीचा प्रश्न, प्रत्येक शासकीय विभागातील भ्रष्टाचार आदी प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी काळे झेंडे घेऊन संयुक्त जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.

























