नाशिक – विशेष प्रतिनिधी
राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा राज्यातील जिल्हा परिषदेतील ११८३ अधिकारी व कर्मचारी भगिनींनी लाभ घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पात्र नसतानाही योजनेचा जाणीवपूर्वक लाभ घेऊन शासनाची दिशाभूल केली असून त्यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत आवश्यक ती कारवाई करून अहवाल पाठवण्याचे राज्य शासनाने सूचित केले आहे.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेचा अनेक अपात्र महिलांनी लाभ घेतल्याच्या तक्रारी आल्याने महिला व बाल कल्याण विभागातर्फे पात्र महिलांच्या यादीची बारकाईने छाननी केली. त्यात राज्यातील विविध जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत असलेल्या ११८३ अधिकारी व कर्मचारी महिलांचा समावेश असल्याचे उघड झाले. संबंधित महिला अधिकारी व कर्मचारी जिल्हा परिषदेत कार्यरत आहेत. सदर योजनेच्या अपात्रतेच्या अटीनुसार या महिला अधिकारी व कर्मचारी पात्र नसतानाही त्यांनी योजनेचा जाणीवपूर्वक लाभ घेऊन शासनाची दिशाभूल केल्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.
त्यामुळे या प्रकरणात संबंधितांवर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत आवश्यक ती कारवाई करून त्याचा अहवाल महिला व बालकल्याण विभागाला पाठवण्याचे पत्रात नमूद केले आहे. दरम्यान, नाशिक जिल्हा परिषदेतील किती महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अपात्र असताना योजनेचा लाभ घेतला याची माहिती संकलीत केली जात असल्याचे समजते.

























