– सुदैवाने नागरिक बचावले…
नाशिक – विशेष प्रतिनिधी
अत्यंत वर्दळीच्या टिळक पथावरील नाशिकरोड बस थांब्यामागील लिंबाचा जुना वृक्ष शुक्रवारी सायंकाळी सात वाजता अचानक कोसळला. गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस असल्याने देखावे बघण्यासाठी गणेशभक्तांची गर्दी होत असताना घडलेल्या या घटनेमुळे रविवार कारंजाकडून येणारी वाहतूक वळवावी लागली. यात अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे.
रविवार कारंजाकडून रेडक्रॉसकडे जाताना नाशिकरोड बस थांब्यामागे हे झाड शेकडो वर्षांपासून तग धरून उभे होते. मात्र शुक्रवारी सायंकाळी सात वाजता हा वृक्ष अचानक कोसळला. सुदैवाने यात कोणी जखमी झाले नसले तरी अनेक वाहने झाडाखाली अडकली होती. नागरिकांनी याबाबतची माहिती दिल्यानंतर अग्निशामक दलाच्या मुख्यालयातील लिडींग फायरमन संतोष आगलावे, फायरमन एन.पी. म्हस्के, पी.आर. इम्पाळ, प्रविण रुपवते, साहिल जाधव यांनी घटनास्थळी घेतली. वुडकटरच्या सहाय्याने मोठ्या फांद्या कापून अडकलेली वाहने बाहेर काढली. मेघवाळ समाजाचे कार्यकर्ते व परिसरातील नागरिकही मदत कार्यात सहभागी झाले होते. रात्री उशिरापर्यंत झाड हटवण्याचे काम सुरू होते. यामुळे परिसरातील वाहतूक व नागरिकांची वर्दळ मंदावली होती. या भागातील व्यावसायिकांच्या उलाढालीवरही परिणाम झाला.





























