पंचवटी – प्रतिनिधी
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी जगन्नाथ कटाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. रोटेशनप्रमाणे विनायक माळेकर यांनी उपसभापतिपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते. शनिवार (दि.११) रोजी सकाळी १० वाजता बाजार समिती कार्यालयात ही निवडप्रक्रिया पार पडली. बाजार समितीच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही नवनिर्वाचित उपसभापतीपदी कटाळे यांनी दिली.
सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार शनिवारी (दि.११) सकाळी साडे दहा वाजता सभापती कल्पना चुंभळे यांच्यासह जेष्ठ संचालक शिवाजी चुंभळे संपतराव सकाळे, युवराज कोठुळे, तानाजी करंजकर, प्रल्हाद काकड, धनाजी पाटील, राजाराम धनवटे, भास्करराव गावित, सविता तुंगार, व्यापारी प्रतिनिधी संदीप पाटील, जगदीश आपसुंदे, हमाल मापारी प्रतिनिधी चंद्रकांत निकम आदीसह संचालक बाजार समितीमध्ये दाखल झाले. सकाळी दहा वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा तालुका उपनिबंधक सहकारी संस्था संदीप जाधव यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली.
उपसभापतीपदासाठी जगन्नाथ कटाळे यांचा एकमेव अर्ज भरल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. उपसभापती पदासाठी सूचक संपत सकाळे तर अनुमोदन विनायक माळेकर होते. यावेळी बाजार समिती सचिव निवृत्ती बागुल, सहायक सचिव विजय निकम, मनोज महाले, मुख्य लिपिक शंतनु झोमन, रविंद्र तुपे, जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील राजेश आव्हाड उपस्थित तसेच त्र्यंबक तालुक्यातील जिल्हा परिषद व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
विश्वास सार्थ ठरवणार !
सभापती व सहकारी संचालक मंडळाने माझ्यावर विश्वास टाकत उपसभापतीपदी निवड केल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आजवर शेतकरी हिताचीच कामे करीत आलो. यापुढेही ही कामे करीत राहील. संचालक मंडळाने दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन.
– जगन्नाथ कटाळे, उपसभापती.

























