– राहूल धोत्रे खून प्रकरण
पंचवटी – विशेष प्रतिनिधी
नांदूर नाका परिसरात पोळा सणाच्या दिवशी राहूल धोत्रे याचा खून व अजय कुसाळकर याच्या खुनाचा प्रयत्न याप्रकरणी फरार असलेला स्थायी समितीचा माजी अध्यक्ष व भाजपाचा माजी नगरसेवक उद्धव उर्फ बाबा बाबुराव निमसे याने सोमवारी शहर पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकासमोर शरणागती पत्करली आहे. नाशिकच्या जिल्हा न्यायालय व मुंबईच्या उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला गेल्यानंतर निमसे याने पोलिसांच्या कारवाईला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे.

मृत राहूल धोत्रे…..
पोळा सणाच्या (दि.२२ अॉगस्ट) दिवशी दुचाकीचा धक्का लागल्यावरून झालेल्या वादानंतर निमसे समर्थकांनी राहूल धोत्रे तसेच त्याचा आतेभाऊ अजय कुसाळकर यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवण्यात आला होता. यात दोघेही गंभीर जखमी झाले होते. खासगी रुग्णालयात उपचार घेताना राहूलचा मृत्यू झाल्याने या गुन्ह्याला खुनाचे वाढीव कलम लागले होते.
यात भाजपचा माजी नगरसेवक व स्थायी समितीचा माजी अध्यक्ष उद्धव निमसे संशयित म्हणून समावेश होता. अटक टाळण्यासाठी उद्धव निमसे याने प्रथम जिल्हा न्यायालय व नंतर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र दोन्ही ठिकाणी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आले होते. एवढेच नाही तर उच्च न्यायालयाने पोलिसांच्या तपासाबाबत ताशेरे ओढले होते.
शिवसेना ठाकरे गट व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी विविध प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर शहरात अलीकडेच काढलेल्या संयुक्त जनआक्रोश मोर्चामध्येही राहुल धोत्रे याच्या खुनाचा मुद्दा गाजला होता. खासदार संजय राऊत यांनी या संदर्भात भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना टीकेचे लक्ष्य केले होते. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाच्या प्रतिमेला डाग लागू नये म्हणून काही नेत्यांनी निमसे याला पोलिसांच्या कारवाईला सामोरे जाण्याच्या सूचना दिल्याची चर्चा होत आहे.
——————————————————————-
चालकास अटक अन् बाबा निमसे हजर !
राहूल धोत्रे खून प्रकरणात पोलीस तसेच भाजपावर टीका होत असल्याने या गुन्ह्याच्या तपासाला वेग आला होता. तपासात फरार असलेल्या उद्धव निमसे याला शहराबाहेर सोडण्यासाठी वाहन चालक नामदेव मते याचा हात असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने गुंडा विरोधी पथकाने त्यास रविवारी अटक केली होती. तसेच निमसे परिवारातील एकासही चौकशीसाठी बोलावले होते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यापेक्षा पोलिसांसमोर हजर होण्यास निमसे यांनी धन्यता मानली.
उद्धव निमसे हे गुंडा विरोधी पथकाच्या कार्यालयात दाखल होताच सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते तसेच हवालदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, मलंग गुंजाळ, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, सुनील आडके, दयानंद सोनवणे, कल्पेश जाधव, घनश्याम महाले, सुनिता कवडे यांनी निमसे यांची चौकशी सुरू केली आहे.

























