माणुसकीला काळीमा फासणाऱ्या नराधमास अटक…
नाशिक – विशेष प्रतिनिधी
सातपूरमधील शिवाजीनगर परिसरात रहाणाऱ्या १७ वर्षीय बालिकेची प्रकृती बिघडल्याने तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तपासणीअंती ‘ती’ सात आठवड्याची गर्भवती असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या प्रकरणात गंगापूर पोलिसांची ‘एंट्री’ झाली खरी परंतू पिडीता व तिची आई तोंड उघडण्यास तयार नसल्याने पेचप्रसंग निर्माण झाला होता. पालकच माहिती देण्यास टाळाटाळ करत होते. परंतू ही घटना संवेदनशील असल्याने पोलिसांना सत्य उघडकीस आणण्यासाठी ‘डीएनए’ चाचणीचा निर्णय घेतला अन् जन्मदात्या पित्यानेच पोटच्या मुलीलाच वासनेचा बळी करत गर्भवती केल्याचे निदर्शनास आले. यातील नराधमास जेरबंद करण्यात आले आहे.
यातील बालिकेची प्रकृती बिघडल्याने तिला आईने उपचारासाठी शासकिय रूग्णालय येथे नेले होते. तेथील डॉक्टारांनी तिच्या तपासण्या केल्यानंतर ती सात आठवड्याची गर्भवती असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात येथे माहीती दिली. त्यावरून पिडीतेने दिलेल्या जबाबावरून पिडीतेच्या आईच्या तक्रारीन्वये अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ६४(२), सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासुन सरंक्षण अधिनिअम २०१२ चे कलम ६ अन्वये गुन्हा नोंदवून तपासास प्रारंभ केला.
पोलिसांनी यातील आरोपीबाबत आई व पिडीत मुलगी यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्या काहीएक माहीती देत नव्हत्या तसेच उडवाउडवीचे उत्तरे देत माहीती देण्यास टाळाटाळ करीत होत्या. त्यामुळे आरोपी पर्यंत पोहचण्या इतपत कुठलीही माहीती मिळून येत नव्हती. गुन्हा अतिसंवेदनशील असल्याने तो उघडकीस आणणे गरजेचेच होते. तपासात पिडीत मुलगी व फिर्यादी आई तसेच वडील हे काहीतरी माहीती लपवित असल्याचे निदर्शनास आले.
वरिष्ठ निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक मोतीलाल पाटील तसेच तपास अधिकारी सहायक निरीक्षक पूनम पाटील, परिविक्षाधिन उपनिरीक्षक प्रियंका कवाद यांची दोन तपास पथके तयार करण्यात आले. सहायक निरीक्षक पूनम पाटील यांनी पिडीतेचे व गर्भाचे ‘डीएनए’ सॅम्पल घेवून रासायनिक तपासणी करीता पाठविले. गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक मोतीलाल पाटील व टिमने १०० पेक्षा अधिक लोकांकडे माहिती गोळा करुन तपास सुरु केला. परंतू कुठलीही माहीती मिळुन येत नव्हती. फिर्यादी व पिडीत मुलगी ही वडीलांसोबत नाशिक येथे राहत असल्याने व पिडीतेची आई ही वारंवार मुळगावी जात असल्याने सरतेशेवटी संशयाची सुई पिडीतेच्या वडीलांवर आली. तेव्हा तपास अधिकारी पूनम पाटील यांनी पिडीतेच्या वडीलांचेही ‘डीएनए’ सॅम्पल घेवून रासायनिक तपासणी करीता पाठविले. या तपासणीत पिडीतेच्या वडीलांनीच स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यामुळे ती गर्भवती राहिली असा अहवाल न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा यांच्याकडून प्राप्त झाल्याने पोलिसांनी सुटकेचा मोकळा श्वास सोडला.
… असा सापडला नराधम बाप !
नाते व माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या कृत्यात बापाचाच सहभाग उघड झाल्याने उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, हवालदार रविंद्र मोहीते, मुकेश गांगुर्डे, घनश्याम भोये, मच्छिंद्र वाकचौरे, राकेश राउत, विजय नवले अशांनी पिडीतेचे वडीलांचा शोध घेतला असता तो आठ दिवसांपासून घरीच आला नसल्याची माहिती मिळाली. तसेच आरोपीचा मोबाइल फोन सुध्दा घरीच असल्याचे समजून आले. आरोपी नवीन मोबाईल फोन वापरत असल्याचे समजून आल्याने तांत्रिक विष्लेषनाच्या आधारे तपास करुन पिडीतेच्या वडीलांनि सिबीएस भागातून ताब्यात घेतले. त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबूली दिली आहे.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत, सहायक आयुक्त नितीन जाधव, वरिष्ठ निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पूनम पाटील, निखील पवार, उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, प्रियंका कवाद, हवालदार रविंद्र मोहीते, मुकेश गांगुर्डे, घनश्याम भोये, मच्छिंद्र वाकचौरे, राकेश राउत, विजय नवले, तुषार मंडले, रिना आहेर यांनी केली आहे.

























