– महिला पोलिसांना मानसिक आरोग्य टिकवणे आवश्यक…
नाशिक – प्रतिनिधी
महिला पोलीस अधिकारी आणि महिला कर्मचारी यांच्या मानसिक आरोग्याचे महत्त्व लक्षात घेऊन रेडीओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडीओ च्या मार्फत एक विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात सुमारे ५० महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उत्साहाने सहभागी झाल्या. नाशिक पोलिस दलात कार्यरत महिलांच्या मानसिक सक्षमीकरणासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रवरा मेडिकल कॉलेज, लोणी येथील मानसोपचार तज्ञ डॉ. पार्थ महाजन यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
या उपक्रमाचा उद्देश सांगताना रेडीओ विश्वास च्या समन्वयक रुचिता ठाकूर यांनी सांगितले कि, महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मानसिक ताण-तणावाचे व्यवस्थापन, सकारात्मक विचारसरणी विकसित करणे, कामाचा ताण कमी करण्याच्या तंत्रांचा अवलंब करणे, तसेच वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्यात समतोल राखणे याबाबत जागरूकता निर्माण करणे हा आहे. पोलिस दलात कार्यरत महिलांना दिवसरात्र नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, तसेच कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी विविध जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात. या सततच्या दडपणात त्यांचे मानसिक आरोग्य टिकवणे आवश्यक आहे.
कार्यक्रमादरम्यान डॉ. पार्थ महाजन यांनी उपस्थित सर्वांना एक स्व-मूल्यांकन फॉर्म (Self-Assessment Form) दिला. या फॉर्ममध्ये मानसिक आरोग्य आणि भावनिक स्थिती ओळखण्यासाठी काही विशिष्ट प्रश्नांचा समावेश करण्यात आला होता. या प्रश्नांच्या माध्यमातून महिलांनी स्वतःच्या सध्याच्या ताण-तणावाच्या पातळीचे मूल्यांकन केले. यानंतर डॉक्टरांनी या प्रतिसादांवर आधारित माहिती सत्र घेतले, ज्यात “आपण तणाव कसा ओळखावा, त्याचे शारीरिक आणि मानसिक लक्षणे कोणती असतात आणि तो दूर करण्यासाठी कोणत्या पद्धती अवलंबाव्यात” याचे सविस्तर स्पष्टीकरण दिले.
सत्रानंतर अनेक महिला पोलिसांनी हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त, प्रेरणादायी आणि मानसिक समाधान देणारा असल्याचे मत व्यक्त केले. “आम्ही नेहमी इतरांच्या सुरक्षेची काळजी घेतो, पण स्वतःच्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होते. आजचा कार्यक्रम आम्हाला स्वतःकडे लक्ष देण्याची आठवण करून देणारा ठरला,” असे एका महिला पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
सदर कार्यक्रमासाठी विश्वास ग्रुपचे कुटुंब प्रमुख विश्वास ठाकूर आणि रेडीओ विश्वास चे स्टेशन डायरेक्टर डॉ. हरी कुलकर्णी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले, आणि कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ‘रेडीओ विश्वास’ च्या निलोफर शेख, छाया साबळे, ऋतुजा शिंपी आणि ममता जाधव आदींनी परिश्रम घेतले.

























