मुंबई – विशेष प्रतिनिधी
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासाठी आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले मराठा आंदोलनाचे प्रणेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला मुंबई पोलिसांनी एक दिवसाची मुदतवाढ दिली आहे. मुसळधारेला न जुमानता मराठा आंदोलक मोठ्या संख्येने एकवटल्याने मुंबापुरीमध्ये वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली आहे.
शांततेत आंदोलन करा…तोच मराठा बांधव अशी कळकळीची विनंती करताना जरांगे पाटील यांनी आता आझाद मैदान सोडणार नाही…..आता गोळ्या घातल्या तरी माघार नाही हा खरखरीत इशारा सरकारला दिला आहे. आझाद मैदानावर हजारो मराठा बांधव सहभागी झाला असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चर्चगेट, महापालिका मुख्यालयासह इतर परिसरात फक्त आणि फक्त मराठा आबालवृद्ध आंदोलक दिसत आहे. अनेक आंदोलकांनी रस्त्यावरच ठाण मांडल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली असून कायदा व सुव्यवस्था तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस दलाला शिकस्त करावी लागत आहे. 
दरम्यान, शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेसने या आंदोलनाला पाठिंबा दिला असून अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंकेही आझाद मैदानावर उपस्थित होते. त्याचबरोबरीने खा. ओमराजे निंबाळकर, आ. कैलास पाटील, आ. क्षीरसागर यांनीसुद्धा जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी भेट घेतली. हे आंदोलन सोमवारपर्यंत लांबल्यास मुंबईतील सर्व व्यवस्था कोलमडण्याची भिती आहे. फोर्ट परिसरातील अनेक कार्यालयात काल अधिकारी व कर्मचारी पोहचू शकले नाही. तसेच विविध आस्थापने, दुकाने आंदोलनामुळे बंद होती.

























