पंचवटी – विशेष प्रतिनिधी
श्रावण मासानिमित्त श्री. कपालेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी होणारी भाविकांची गर्दी पाहता दि. २८ जुलै ते २३ अॉगस्ट दरम्यान ‘व्हीआयपी दर्शन’ बंद करण्यात आले आहे. यातून केवळ अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी केंद्र, राज्य अथवा जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावरून लेखी पत्रव्यवहार झाल्यास सूट देण्यात आली आहे.
श्री. कपालेश्वर महादेव मंदिर संस्थानचे प्रशासक वि.भा. पाटील यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. श्री. कपालेश्वर महादेव देवस्थान हे नाशिक शहर व जिल्ह्यातील शिवभक्तांचे श्रद्धेय देवस्थान असून नंदी नसलेल्या महादेवाचे एकमेव मंदिर आहे.
श्रावण मासानिमित्त दर्शन, पूजा विधी, अभिषेक तसेच प्रदक्षिणा घालण्यासाठी मंदिरात पहाटपासून गर्दी उसळत असते. गर्दीमुळे, प्रशासनावर होणारा ताण तसेच निर्माण होणाऱ्या अडचणी व प्रश्न या बाबींचा विचार करता तसेच भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून अपवाद वगळता दि. २८ जुलै ते २३ अॉगस्ट दरम्यान व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आले आहे.

























