नाशिक – विशेष प्रतिनिधी
शहरात गणरायांचे वाजत गाजत आगमन होत असतानाच आज (दि.२७) पोलीस आयुक्तालयाच्या ताफ्यात नविन मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन दाखल झाली आहे. पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या हस्ते या वाहनाचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे क्लिष्ट व गंभीर गुन्हे शाबित होण्याच्या प्रक्रियेतील ‘विघ्न’ दूर होणार आहे.
राज्य शासनाच्या गृह विभागाच्या न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय यांचे मार्फत नविन मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन समाविष्ट झाले आहे. नविन फौजदारी कायद्याची अंमलबजावणी होवून गुन्हे शाबितीचे प्रमाण वाढावे या उद्देशाने गृह विभागा कडून न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा या विभागास शहर पोलीसांकरीता नविन मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. गंभीर व संवेदनशिल गुन्हयाचे घटनास्थळी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनद्वारे भेट देण्यात येणार आहे. ज्यामुळे गुन्हयांचे घटनास्थळी पुरावे मिळणेकामी तसेच गुन्हे उघडकीस येण्याच्या व दोषसिध्दीचे प्रमाणात सहाय्य होणार आहे. 
मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचे उद्घाटन प्रसंगी पोलीस उपायुक्त (पोलीस मुख्यालय), चंद्रकांत खांडवी,
उप संचालक, न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोग शाळा राहुल पवार, सहायक आयुक्त (गुन्हे), श्री. संदिप मिटके तसेच नागेश हडपे (प्रशासकीय अधिकारी), युवराज पत्की (पोलीस निरीक्षक, विशेष शाखा), पंकज पवार (पोलीस निरीक्षक, मोटार परिवहन विभाग), न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोग शाळा नाशिक येथील वैभव देशपांडे (सहाय्यक संचालक), सौ. पुजा जाधव (सहायक रायासयिक तंज्ञ), दिपक शिंदे (वैज्ञानिक अधिकारी), आदर्श चव्हाण, श्रीमती धनश्री पवार, श्रीमती हर्षदा कापडनिस (सहाय्यक रासायनिक विश्लेषक), ऋषिकेश दाभाडे, शेखर गिरासे, श्रीमती धनश्री सोनवणे (वैज्ञानिक सहायक) आदी उपस्थित होते.

























