नाशिक – विशेष प्रतिनिधी
एरोली (नवी मुंबई) येथे नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत नासिकच्या टेबल टेनिस पटूंनी दोन सुवर्ण तर दोन कांस्य पदक पटकावले. १९ वर्षाखालील मुलांच्या गटात नाशिकच्या प्रथम मानांकित कुशल चोपडाने अजिंक्यपद मिळवून सुवर्ण पदक आपल्या नावे केले. कुशलचे राज्यस्तरीय स्पर्धेतील हे सलग सहावे अजिंक्यपद आहे. पुरुषांच्या एकेरीतही चोपडा याने कांस्य पदक पटकावले. मुलींच्या एकेरीत केशिका पुरकरने १३ वर्षाखालील मुलींच्या गटाचे विजेतेपद मिळवित नासिकला दुसरे सुवर्ण पदक मिळवून दिले. केशिकाचे १३ वर्षाखालील मुलींच्या गटातील पहिलीच स्पर्धा असून तिने या गटातील स्पर्धेत विजयाने सुरवात करून सर्वांना आश्चर्यचकित केले. १९ वर्षाखालील मुलींच्या गटात नाशिकच्या स्वरा करमरकरने कांस्य पदक पटकावून चौथे पदक नासिक जिल्ह्याला मिळवून दिले.
कुशल चोपडाने अंतिम फेरीत प्रवेश करण्यापूर्वी उपांत्य फेरीत टीएसटीटीए मुंबईच्या अर्णव शिरसागर याचा ११-६, ११/८, ८-११, ११-५ असा ३-१ ने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत त्याची गाठ पडली ती ठाण्याच्या जोहान सी. याच्याशी. कुशलने त्याचा ११-५, ११-६, ११-९, ११-४ असा सहज पराभव करून सुवर्ण पदक पटकावले. पुरुषांच्या एकेरीत उपांत्य पूर्व फेरीत कुशल चोपडाने प्रथम मानांकन असलेल्या ठाण्याचा दिपित पाटील याचा ११-९, ९-११, ८-११, ११-९, ११-५ असा ३-२ पराभव करून खळबळ उडवून दिली. परंतु उपांत्य फेरीत अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात कोल्हापूरच्या अनिश सोनटक्के याच्याकडून ५-११,११-७, ११-९, ४-११, ११-८, ५-१२, ६-११ असा ३-४ ने पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे अंतिम फेरीत प्रवेश करण्याचे कुशलचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही आणि शेवटी त्याला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
१३ वर्षाखालील मुलींच्या गटात नाशिकच्या केशिका पुरकरने उपांत्य फेरीत टीएसएसटीए मुंबईच्या रीतन्या देवलेकर हिचा ९-११, ११-८, ११-४, ५-११, ११-५ असा ३-२ ने पराभव करून अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत केशिका पुरकरने टीएसएसटीए मुंबईच्याच पलक झवर हिचा ११-८, ११-८, ८-११, ११-५ असा ३-१ ने पराभव करून विजेतेपद आपल्या नावे केले. १९ वर्षाखालील मुलींच्या गटात नाशिकच्या स्वरा करमरकरने अप उपांत्यपूर्व फेरीत टीएसएसटीए मुंबईच्या वैष्णवी जयस्वाल हिचा ३-० ने पराभव करून उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत प्रथम मानांकीत दिव्यांशी भौमिक ने स्वराचा ११-९, ११-७, ११-६ असा ३-० पराभव केल्यामुळे स्वरा करमरकरला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
– वेटरन्स स्पर्धेत नाशिकला दोन सुवर्ण, दोन रजत व दोन कांस्य पदके
पहिल्या राज्य वेटरन्स टेबल टेनिस स्पर्धेत नाशिकच्या टेबल टेनिस पटूंनी दोन सुवर्ण, दोन रजत आणि दोन कांस्य पदके मिळवली. त्यामध्ये ८० वर्षावरील पुरुषांच्या एकेरीच्या गटात नाशिकच्या सतीश शिरसाट तसेच ६५ वर्षावरील पुरुषांच्या एकेरीच्या गटात उमेश कुंभोजकर यांनी सुवर्ण पदक पटकावले. ६० वर्षावरील महिलांच्या गटात स्वाती आगरकर यांनी रजत पदक पटकावले तसेच स्वाती आगरकर यांनी ४० वर्षावरील महिला गटाच्या सांघिक स्पर्धेतही रजत पदक पटकावले. ७० वर्षावरील पुरुषांच्या एकेरीच्या गटात शिवानंद कुंडाजे तसेच ६५ वर्षावरील महिलांच्या एकेरीच्या गटात ज्योती कुलकर्णी या दोघांनी कांस्य पदक पटकावले. खेळाडूंचे या यशाबद्दल नासिक जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, उपाध्यक्ष शेखर भंडारी, मिलिंद काचोळे, सचिव राजेश भरवीरकर, कोषाध्यक्ष अभिषेक छाजेड, सौ. अलका कुलकर्णी, संजय वसंत, सतीश पटेल, अलीअसगर आदमजी, कोच जय मोडक व पुनीत देसाई यांनी अभिनंदन केले आहे.

























