– ‘पंचवटी’ च्या निर्भया पथकाची कामगिरी….
पंचवटी : प्रतिनिधी
निर्भया मोबाईल पथक रामकुंड गोदाघाट परिसरात पायी पायी घालत असताना गुजरात येथील एक २० वर्षीय युवती रामकुंडात स्नान करत असताना पाण्याच्या प्रवाहात ओढली जात असल्याचे निदर्शनास येताच निर्भया पथकातील पोलीस हवालदार विजय विधाते यांनी नदीपात्रात उडी मारून सुखरूप बाहेर काढले.
शहर व धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शनिवार, रविवारी पडलेल्या पावसामुळे गोदावरीला पूर आला होता. परंतु दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असली तरी अद्यापही गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह चालू आहे. गोदाघाट रामकुंड परिसरात भाविक देवदर्शनासाठी येतात आणि ते रामकुंड तीर्थात स्नान करतात. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने अनेक भाविकांना त्याचा अंदाज येत नाही, त्यामुळे काही ना काही घटना घडत असल्याचे दिसून येत आहे.
पंचवटी निर्भया मोबाईल पेट्रोलिंग दरम्यान रामकुंड घाट परिसरात पंचवटी निर्भया पथकाचे हवालदार विजय विधाते व महिला अंमलदार रेखा देशमुख, स्वाती ढगे व चालक दिलीप नागरे पायी पेट्रोलिंग करत असताना गुजरात राज्यातील मीनाक्षी मकरंद यादव (२०) ही युवती रामकुंड परिसरात स्नान करत असताना पाण्याच्या प्रवाहाने नदीपात्रात ओढल्याने वाहून जात असल्याचे दिसली. यावेळी निर्भया पथकातील अंमलदार विजय विधाते यांनी पाण्यात उडी मारून त्या युवतीचा जीव वाचवला. तिला स्थानिकांच्या मदतीने पाण्याबाहेर काढून पालकांच्या ताब्यात सुखरूप दिले. यावेळी निर्भया पथकाने परिसरातील भाविकांना नदीला पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने काळजी घेण्याचे आवाहन केले.

























