– ‘धर्म की जय हो, अधर्म का नाश हो’ घोषणाने गोदाघाट दुमदुमला
पंचवटी – प्रतिनिधी
सत्याने असत्यावर… सृष्टांनी दुष्टावर अन् देवांनी असुरांवर मिळविलेल्या विजयाचे प्रतीक असलेल्या रावण दहनाचा कार्यक्रम विजयादशमीला सायंकाळी गोदेच्या खळाळत्या प्रवाहाच्या साक्षीने श्रीक्षेत्र रामकुंड येथे फटाक्यांच्या आतषबाजी करत मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी गोदाघाट गर्दीने फुलून गेला होता.
दसऱ्याच्या मुहूर्तावर विजयाचे प्रतीक म्हणून आपल्याकडे रावणाचा पुतळा दहन करण्याची जुनी परंपरा आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पंचवटी रामकुंड येथील श्री चतुः संप्रदाय आखाड्याच्या वतीने श्री व्यंकटेश बालाजी मंदिर यांच्या वतीने ५८ वर्षांपासून रावणदहन केले जाते. या आखाड्याचे तत्कालीन महंत दीनबंधूदास महाराज यांनी १९६७ साली रामकुंड परिसरात प्रथम सुरू केलेली परंपरा आजही महंत कृष्णचरणदास महाराज यांनी अव्याहतपणे सुरू ठेवली आहे. यावेळी उपस्थित साधूगणांच्या हस्ते रावणाच्या प्रतिकृतीचे विधिवत पूजन करून रावणदहन करण्यात आले. यावेळी रावणाच्या पुतळ्याला अग्नी देताच भाविकांनी ‘सियावर रामचंद्र की जय, धर्म की जय हो, अधर्म का नाश हो’ या घोषणा देत आसमंत दुमदुमून टाकला होता.
सोमवार दि.२२ सप्टेंबर ते शनिवार दि. ४ ऑक्टोबरपर्यंत बालाजी मंदिरात नवरात्रोत्सव संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने श्री व्यंकटेश बालाजी भगवान यांची प्रतिपदेपासून दशमीपर्यंत वेगवेगळ्या वाहनावर, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या अवतारांच्या रूपात शृंगार करून भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर खुले असते. यात श्री व्यंकटेश बालाजी भगवान यासाठी मयुरासन, चंद्रासन, नागासन, गजासन, अर्धनारी नटेश्वर अवतार आदी रूपांमध्ये श्री व्यंकटेश बालाजी भगवान यांना सजविले जाते.
विजयादशमीला (दि.२) संध्याकाळी साडेसात वाजता श्रीराम विजय, रावणदहन, आतषबाजी व श्रींची विशेष आरती झाली. याप्रसंगी बालाजी मंदिराचे प्रमुख महंत श्रीकृष्ण चरणदास महाराज, महंत भक्तीचरणदास महाराज, महंत फलाहारी महाराज, महंत पितांबरदास महाराज, महंत माधवदास महाराज, महंत हरिओम दास महाराज, ‘इस्कॉन’ चे वैश्विक सदस्य गौरांग प्रभुजी, प.पू. राधानाथस्वामी, माजी आमदार बाळासाहेब सानप, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपायुक्त परिमंडळ एकचे श्रीमती मोनिका राऊत, सहाय्यक पोलिस आयुक्त श्रीमती संगिता निकम, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र यांच्यासह व्यंकटेश बालाजी मंदिराचे सागर कापसे, कपिल भोरे, कृष्णकुमार नेरकर, सांटोकदास उदासी, घनश्याम गंधे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी पंचवटी परिसरातून श्रीराम सेना, वानर सेना व रावण सेना यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. साडेसात वाजेच्या सुमारास ही मिरवणूक रामकुंडावर पोहचल्यावर या ठिकाणी दोनही सेनेचे प्रतीकात्मक युद्ध होऊन प्रभू श्रीरामांचा विजय झाला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते रावणाच्या पुतळ्याचे पूजन करून रावणदहन करण्यात आले. यावेळी आकर्षक व नयनरम्य आतषबाजी करण्यात आली. हा सोहळा पाहण्यासाठी होळकर पूल, रामकुंड परिसर, गांधी तलाव, एकमुखी दत्त मंदिर आदी ठिकाणी हजारो नाशिककरांनी गर्दी केली होती. यावेळी श्रीरामांच्या भूमिकेत यश कोठावदे, इंद्रजीत (प्रितेश) बैरागी लक्ष्मणाच्या भूमिकेत क्रिश आढळकर, मारुतीच्या भूमिकेत विवेकानंद घोडके, रावणाच्या भूमिकेत छोटूराम आढळकर, विभीषणच्या भूमिकेत आदित्य शिंदे, कुंभकर्णाच्या भूमिकेत कुमार आढळकर, बैरागी यांनी साकारल्या होत्या.
या कार्यक्रमासाठी पद्माकर पाटील, कृष्णकुमार नेरकर, नंदू पवार, सतीश शुक्ल, रावसाहेब कोशिरे आदींसह मान्यवर आणि नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. गर्दीचे नियोजन करण्यासाठी पंचवटी पोलीस ठाण्याच्या वतीने पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यादरम्यान रामकुंडाकडे येणारी वाहतूक बंद करण्यात आली होती. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी रवि आवरकर, राजेंद्र आढळकर, शामराव गंधे, कपिल भोरे, भाग्येश देशपांडे, नंदकुमार बैरागी, निलेश भोरे, घनश्याम बैरागी,रमेश बैरागी, राज शर्मा, महेश बैरागी,सोनू वशिष्ठ,आकाश बैरागी,हेमंत शिरसाठ, रंभाताई आवरकर, योगेश आढळकर, दीपक अग्रहरी मनोज अग्रहरी, सत्यम वशिष्ठ,भाग्येश देशपांडे यांनी परिश्रम घेतले.
… धर्म की जय हो, अधर्म का नाश हो !
रावणदहन व श्रीराम विजय हा कार्यक्रम चतुःसंप्रदाय आखाडा यांच्या वतीने नाशिकमध्ये सर्वात प्रथम सुरू करण्यात आला आहे. या उत्सवाला मोठी परंपरादेखील आहे. रामकुंडाजवळील मैदानात सुमारे ५१ फूट उंचीचा रावणाचा पुतळा चतुः संप्रदाय आखाडा ट्रस्टच्या वतीने बनविण्यात आला होता. संध्याकाळी ६ वाजता श्रीराम, लक्ष्मण, मारुती, वानरसेना त्याचप्रमाणे रावण, कुंभकर्ण, विभीषण, वानर व राक्षससेना यांची पंचवटी परिसरातून मिरवणूक काढून संध्याकाळी सात वाजता रामकुंडाजवळील मोकळ्या मैदानात आगमन झाले. त्यानंतर वानरसेना व राक्षस सेना यांच्यात युद्ध सुरू झाले. यावेळी संगमनेरवाला यांच्या वतीने नयनरम्य अशी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या आतषबाजीने आलेल्या भाविक, भक्त व नागरिकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. त्यानंतर मारुती व इंद्रजित यांचे युद्ध झाले. रावण, कुंभकर्ण, मेघनाद यांच्याबरोबर श्रीराम व लक्ष्मण यांचे युद्ध झाले. सर्व राक्षसांचा वध करून शेवटी ५१ फुटी रावणाच्या पुतळ्यास अप्रिडाग देण्यात आला. दारुगोळा भरलेल्या रावणास अग्निडाग दिल्यानंतर उपस्थित जनसमुदायाने सियावर रामचंद्र की जय, धर्म की जय हो, अधर्म का नाश हो असा जयजयकार केला.

























