हायजंप प्रकारात अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला भारतीय खेळाडू…
नाशिक – क्रीडा प्रतिनिधी
देशाच्या क्रीडा इतिहासात आज नाशिककरांची मान उंचावणारा क्षण आला आहे. जपानच्या टोकियो येथे सुरू असलेल्या वर्ल्ड अथलेटिक्स चॅम्पियनशिप या स्पर्धेत नाशिकच्या देवरगावचा सुपुत्र सर्वेश कुशारे याने इतिहास रचला. सर्वेश हा हायजंप प्रकारात तब्बल २.२८ मीटर उंच उडी मारत अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. या यशानंतर सर्वेशने दिलेल्या “छत्रपती शिवाजी महाराज की जय” या जयघोषाने अवघं वर्ल्ड अथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेचं मैदान दणाणून आणि तमाम मराठी मनाला सुखावणारा क्षण ठरला. 
या यशामुळे सर्वेशवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वेशने मारलेली ही झेप म्हणजे महाराष्ट्राच्या लढाऊ आणि जिद्दी मातीचा खरा विजय असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. सर्वेशने अंतिम फेरीत प्रवेश केल्यानंतर मैदानात दिलेल्या “छत्रपती शिवाजी महाराज की जय!” या गर्जनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

























