नाशिक – विशेष प्रतिनिधी
अत्यतं वर्दळीच्या नाशिक-पुणे महामार्गावरील सेंट झेवियर्स स्कूलजवळील चौकात सोमवारी (दि. १४) दुपारी २:३० वाजता, मुसळधार पावसातही
एक हृदयस्पर्शी दृश्य पहायला मिळाले. “काका, आम्हाला वाचवा!” अशी भावनिक साद घालत विद्यार्थ्यांनी रस्त्यावरील वाढत्या अपघातांविरोधात आणि सुरक्षिततेच्या मागणीसाठी एकत्र येऊन आंदोलन केले. या आंदोलनात शालेय विद्यार्थी, त्यांचे पालक आणि रिक्षाचालकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला, ज्यामुळे प्रशासनाला रस्ते सुरक्षेचा प्रश्न गंभीरपणे घ्यावा लागेल.
मुसळधार पावसाने अनेकांना आंदोलनस्थळी वेळेवर पोहोचण्यात अडथळे आणले, तरीही विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा उत्साह कायम होता. रस्ता ओलांडताना जीव मुठीत घेऊन चालावं लागतं, अशी भावना व्यक्त करताना लहान मुलांनी “काका, आम्हाला वाचवा!” अशी साद घातली. त्यांच्या निष्पाप आवाजात रस्त्यावरील असुरक्षिततेची भीती स्पष्टपणे जाणवत होती. पालकांनीही मुलांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावरील खड्डे, अपुरे स्पीडब्रेकर आणि रिफ्लेक्टरचा अभाव यासारख्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
आंदोलकांच्या मागण्या…
आंदोलनात सहभागी झालेल्यांनी स्पष्ट मागण्या मांडल्या. स्पीडब्रेकरची उंची वाढवावी. रस्ता रुंद करावा आणि खड्डे बुजवावेत. रिफ्लेक्टर आणि पांढरे पट्टे मारून स्पीडब्रेकरचे फलक लावावेत.
द्वारका ते नाशिक रोड दरम्यान उड्डाणपूल बांधावा. या मागण्यांसह “आमच्यासह प्रत्येकाचा जीव वाचवा, सुरक्षित रस्ते द्या!” अशी घोषणा देत आंदोलकांनी प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला. आंदोलनात शिवसेना उपमहानगरप्रमुख विक्रम कदम यांच्यासह महिला आघाडी विभाग अध्यक्ष सुनीता जाधव, पालक विकास जाचक, स्वप्निल लोखंडे, योगेश जाचक, दिपाली कदम यांनी सक्रिय सहभाग घेतला. विद्यार्थ्यांमध्ये ईशना कांबळे, समृद्धी कदम, तनिष्का जाचक, शर्विल लोखंडे, श्रेयस कदम, हर्षवर्धन जाचक, आराध्य जाचक, कार्तिक शिंदे, श्रावणी चव्हाण, भूमि मोहिते, स्वरुप यांच्यासह अनेक विद्यार्थी पालकांनी मुसळधार पावसात भिजत आंदोलनात सहभाग नोंदवला. त्यांच्या या जिद्दीने उपस्थित हेलावले होते.
नाशिक – पुणे महामार्गावर द्वारका ते नाशिकरोड दरम्यान दिवसेंदिवस अनेक अपघात होऊन अनेकांचे जीव गेले आहेत. दिवसभरात अनेक स्कूल बस, रिक्षा चालक तसेच लहान मुले, पालक आणि कामगार यांचे जीव धोक्यात आहेत. अपघात झाल्यास जबाबदार कोण ?, असा प्रश्न विचारात रस्त्यावरील अपघात थांबवण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, असे आवाहन विक्रम कदम यांनी प्रशासनाला केले. पालकांनीही मुलांना रस्ता ओलांडताना वाटणारी भीती व्यक्त करत प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे, अशी विनंती केली.
“काका, आम्हाला वाचवा!” हे आंदोलन केवळ एक मागणी नव्हे, तर मुलांच्या आणि पालकांच्या सुरक्षित भविष्यासाठीचा हृदयस्पर्शी आक्रोश होता. आता प्रशासन या मागण्यांकडे किती गांभीर्याने पाहते आणि रस्ते सुरक्षित करण्यासाठी काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुसळधार पावसातही झालेले हे आंदोलन निश्चितच बदल घडवून आणेल, अशी आशा आंदोलकांनी व्यक्त केली.

























