– विख्यात नेमबाज व अॉलिम्पिक पदक विजेते स्वप्निल कुसळे यांची उपस्थिती…
– नाशिकमधील मिसळीचे जनक…
– मिठाई व दिवाळीचा फराळ हे वैशिष्टय…
नाशिक – विशेष प्रतिनिधी
शहरातील सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय यासह विविध क्षेत्रातील घडामोडींचे साक्षीदार असणारे व ११३ वर्षांची शतकोत्तर परंपरा लाभलेले व हे मिठाई व रेस्टॉरंट आणि दिवाळीच्या फराळासाठी प्रसिद्ध असलेले ‘भगवंतराव’ मेनरोडवरील पूर्वीच्याच जागेतील नव्या वास्तूत व प्रशस्त रुपात नाशिककरांसाठी सेवेत रूजू होत आहे. नाशिककरांच्या हृदयात व जिभेवर अढळस्थान मिळवणारे हे केवळ व्यावसायिक ठिकाण म्हणून नव्हे तर आपुलकीचा कट्टा म्हणून नाशिककरांसाठी हक्काची जागा होते. अनेक पिढ्यांनी ही आठवण आजही आपल्या हृदयात जपली आहे.
काळाबरोबर बदलत ‘भगवंतराव’ नवा साज नवे रूप धारण करून नाशिककरच नव्हे तर राज्याच्या विविध भागातून येणाऱ्या खवय्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. यानिमित्ताने विख्यात नेमबाज व अॉलिम्पिक पदक विजेते स्वप्निल कुसळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (दि. २९) नागपंचमीच्या मुहूर्तावर भव्य शुभारंभाचे आयोजन केले आहे. याप्रसंगी शहरातील विविध क्षेत्रातील नामवंत आपल्या आठवणींना उजाळा देण्यासाठी उपस्थित रहाणार आहेत.
नाशिक हे भाविकांचे शहर…सिंहस्थ कुंभमेळा…सातासमुद्रापार जाणारे द्राक्ष…चलनी नोटांचा कारखाना…एचएएल यासारख्या विविध कारणांनी प्रसिद्ध होते. या परंपरेत भर पडली ती नाशिकच्या मिसळची. नाशिक मधील मिसळीचे मुळ जनक होते कै.भगवंतराव अष्टपूत्रे. ‘भगवंतराव मिसळ’ खाणे म्हणजे एक प्रकारचा थाट होता. सात्विक, चविष्ट चव आणि सुदंर आसन व्यवस्था म्हणजे एक सरंजामी थाट. मुळ मालक कै. भगवंतराव अष्टपुत्रे यांनी तीर्थ नगरी नाशिक मधे येणार्या भाविकांची गरज ओळखून सन १९१२, नागपंचमीच्या मुहूर्ताव मेनरोड, नाशिक येथे ‘भगवंतराव हाॅटेल’ सुरू केले. 
त्या वेळचे सात्विक पदार्थ म्हणून पोहे, साबूदाणा खिचडी, उपवासाची बटाटा भाजी, मटकी अथवा मुगाची उसळ, भाजणी थालीपीठ व गोडात शिरा,करंजी, बेसन लाडू, चिरोटे असे पदार्थ असत. पुढील पिढीतील भगवंतराव यांचे चिरंजीव कै.विष्णुपंत यांनी ही धुरा सांभाळली. हा काळ साधारण १९३८ चा असावा व एके दिवशी हाॅटेल मधील सर्व खमंग पदार्थांची सरमिसळ करत नाशिक मध्ये प्रथमच ‘मिसळ’ या पदार्थाची मुहूर्तमेढ रोवली.
विष्णुपंत यांना तीन मुले. पुढे कै. वसंतराव, दत्तोपंत व वामनराव यांनी हा व्यवसाय भरभराटीस आणून राज्यातच नव्हे तर पूर्ण देशात पांडे मिठाई, कोंडाजी व मकाजी चिवडा यांच्या प्रमाणे नावलौकिक प्रस्थापित केला. हा काळ होता अंदाजे सन १९५४ चा. वसंतराव हे न्याहरीचे पदार्थ, दत्तोपंत हे गोड पदार्थ व मिठाई यात कुशल व पारंगत होते. त्या काळात एक दिवस वसंतराव व दत्तोपंत यांना एक कल्पना सुचली व त्यानुरूप हाॅटेलच्या प्रसिद्ध मिसळ बरोबरच कोशिंबीर, कांदा, लिंबू, दही व पापड, फरसाण सोबतीस देऊन मिसळचा थाट वाढवला. तयार झालेला पदार्थ व चव अप्रतिम लागल्याने, रोजच्या खाद्य पदार्थात ती डिश ‘भगवंतराव मिसळ’ या नामकरणासह दाखल झाली, व भगवंतराव मिसळीचा खमंग वास सर्वदूर पसरला.

अॉलिम्पिक पदक विजेता स्वप्निल कुसळे यांचा गौरव करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
मिसळबरोबरच भगवंतरावमधील इतर खाद्य पदार्थ व विविध मिठाई यांनी खवय्यांच्या मनात स्थान मिळवले होते. ‘भगवंतराव’ मधील स्वच्छता, मालाचा दर्जा, चव याचा स्वाद दूरवर पसरत असतानाच ग्राहकांचे मागणीनुसार घरगुती दिवाळी फराळ, उत्सवानुसार नैवेद्य पदार्थ पण उपलब्ध करून देण्यात आले. त्यासाठी सुहास व पत्नी सौ.मंगलाताई अष्टपुत्रे यांनी सहयोगातून उत्तम दर्जासह ग्राहक सेवेत सादर केले व त्यास ग्राहक मान्यता मिळवून दिली. त्यामुळे आता आपल्या हक्काच्या ‘भगवंतराव’ ने रूप बदललं असले तरी चव व आपुलकीची शतकोत्तर परंपरा अविरतपणे सुरूच रहाणार आहे. त्यामुळे यायलाच लागतयं !

























