पुणे –
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अलीकडेच झालेल्या पुणे दौऱ्यात बंदोबस्तावर असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याचा भाजपा पदाधिकाऱ्याकडून विनयभंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत त्याला पक्षाच्या पदावरून मुक्त करण्यात आले असून पोलिसांनी त्यास अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद विठ्ठल कोंढरे असे त्या भाजपा पदाधिकाऱ्याचे नाव असून तो पुणे शहर सरचिटणीस म्हणून कार्यरत होता. विशेष म्हणजे ही घटना घडली तेव्हा कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने व इतर पदाधिकारी तिथेच उपस्थित होते.
ना. नितीन गडकरी पुणे दौऱ्यावर असताना त्यांचा शनिवार वाडा परिसरात कार्यक्रम होता. तेव्हा आ. रासने हे कार्यकर्त्यांसह बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिसांसमवेत एका दुकानात चहा पिण्यासाठी गेले होते. तेथील गर्दीचा फायदा घेत प्रमोद कोंढरे याने महिला पोलीस अधिकाऱ्याला लज्जा उत्पन्न अशा पद्धतीने दोनदा स्पर्श केल्याची तक्रार वरिष्ठांकडे करण्यात आली. त्यानंतर पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रमोद कोंढरेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार फरासखाना पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विशेष म्हणजे प्रमोद कोंढरेविरुद्ध यापुर्वीही विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. या संपूर्ण प्रकरणाचे सीसीटीव्ही फूटेजही समोर आले आहे. कोंढरे यास अटक करण्यात आली आहे.

























