– दिंडोरी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी…
नाशिक – विशेष प्रतिनिधी
दिवसा शेतात काम करून रात्री पेठ महामार्गावरील सावळ घाटात वेग कमी होताच वाहनांची लूट करून साहित्य लंपास करणाऱ्या आठ जणांच्या टोळीला जेरबंद करण्यात दिंडोरी पोलिसांना यश आले आहे. यासाठी वापरली जाणारी छोटा हत्ती व मोटार सायकल ही वाहनेही हस्तगत करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविंद्र अंबादास दळवी (वय २५), माधव चंदर शेखरे (वय ३०), लालु गोरख पवार (वय २६), गणेश हौसीराम कडाळे (वय ३२), आनंदा भास्कर पवार (वय २२
सर्व रा. मोहपाडा, ता. सुरगाणा), दिनेश रामदेव गवारे (वय २५, रा. करंजाळी (देवपाडा) ता. दिंडोरी), चेतन प्रभाकर चारोस्कर (वय २५, रा. गोंडेगाव भाऊसाहेब नगर, शिव चांदोरी ता. निफाड), संजय प्रभाकर बेंडकोळी (वय ३०, रा. लखमापुर (कोळीवाडा) ता. दिंडोरी) अशी संशयितांची नावे आहेत.
याबाबतचे अधिक वृत्त असे की, पाच सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास आयशर गाडी (क्रमांक एमएच २१ – बीएच ९९२२) मध्ये माल भरुन पेठ बाजूकडून नाशिककडे जात असतांना सावळघाटात अज्ञात आरोपी यांनी चालत्या गाडीची मागील ताडपत्री कापून गाडीतील मोती साबणाचे ०५ बॉक्स चोरुन नेले होते. याप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सावळघाटात याआधी देखील मागील दीड ते दोन वर्षापासून चालत्या वाहनातून माल चोरीला गेल्याच्या घटना वारंवार घडलेल्या होत्या. त्यामुळे या टोळीचा शोध लावणे हे पोलिसांसमोर आव्हान होते.
दिंडोरी पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी जावून घटनास्थळाची पाहणी करुन सदर ठिकाणी वेळोवेळी पाळत ठेवली. तसेच बातमीदारा मार्फत व तांत्रिक विश्लेषणाद्वारे सदरचा गुन्हा हा सुरगाणा तालुक्यातील सराईत गुन्हेगारांनी केली असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्यानुसार आरोपींच्या शोधासाठी दिंडोरी पोलीस पथकाने सुरगाणा, निफाड व दिंडोरी तालुक्यातून संशयितांना ताब्यात घेतले.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील, अपर अधिक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय अधिकारी (कळवण) किरण कुमार सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरीचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर, उपनिरीक्षक सुदर्शन आवारी, मनोज खुळे, अल्ताफ शेख, सहायक निरीक्षक संजय गायकवाड, नागेश गायकवाड, हवालदार गुलाब पवार, विश्वनाथ काकड, पराग गोतुरणे, कमलेश देशमुख, प्रदिप शिंदे, पोलीस अंमलदार दिलीप राऊत, प्रविण भोईर, झांबरु सुर्यवंशी, दशरथ साबळे, विशाल पैठणकर, प्रकाश गायकवाड, अविनाश आहेर, ललीत जाधव आणि तांत्रिक विश्लेषण विभागातील हवालदार हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.
…. अशी होती ‘मोडस् अॉपरेंडी !
संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपी हे निफाड तसेच दिंडोरी तालुक्यातील वेगवेगळ्या शेतकऱ्यांकडे कामास आहे. ते दिवसभर शेतात काम करुन रात्रीचे सुमारास एकत्र यायचे. नाशिक पेठ महामार्गावरील सावळ घाटात रात्रीचे सुमारास झाडा झुडपात दबा धरून बसायचे. घाट चढुन जाणाऱ्या गाड्यांवर लक्ष ठेवून घाटामध्ये गाडीचा वेग कमी होताच काही साथीदार प्रवाशी वाहतूक करणाऱ्या लक्झरी बसवर अथवा माल वाहतुकीच्या वाहनावर चढुन तिच्यावरील बॅगा तसेच मालवाहु गाडीवर पाठीमागून चढून ताडपत्री कटरने कापायचे. गाडीमधील सामान खाली फेकून द्यायचे व इतर साथीदार फेकून दिलेले सामान जमा करुन जंगलात पळून जायचे.

























