नाशिक – विशेष प्रतिनिधी
सावकारांच्या जाचाला कंटाळून सातपूरमधील ध्रुवनगर परिसरात रहाणाऱ्या राजेंद्र भगवान परदेशी या ३९ वर्षीय युवकाने विषारी औषध प्राशन करून स्वतःला संपवले. तत्पूर्वी त्याने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमुळे या प्रकरणाचा उलगडा झाला असून तिघा सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तिसरा फरार झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शामराव पाटील उर्फ गिरणारकर (वय ५३, रा. फ्रावशी कॉलेजमागे, दुगांव), मोहन खोडे (वय ४५, रा. अथर्व रेसीडेन्सी, भवर टॉवर समोर, शिवाजीनगर), नंदु बच्छाव (रा. लखमापूर, बागलाण) अशी तिघा सावकारांची नावे असून शामराव पाटील व मोहन खोडे यांना अटक करण्यात आली आहे.
याबाबतचे अधिक वृत्त असे की, राजेंद्र भगवान परदेशी (वय ३९, रा. शारदा अपार्टमेंट, रियल स्वीट मागे, ध्रुवनगर, शिवाजीनगर) या युवकाने शामराव पाटील उर्फ गिरणारेकर याच्याकडून थोडे थोडे करून सहा टक्के व्याज दराने चार लाख ७० हजार रुपये तर नंदु बच्छाव याच्याकडून चार टक्के व्याज दराने तीन लाख रुपये घेतले होते. या पैशांच्च्या व व्याजाच्या परतफेडीसाठी तिघांनी सारखा तगादा लावत त्रास देण्यास सुरुवात केली. या त्रासाला कंटाळून राजेंद्र परदेशी याने तीन सप्टेंबर रोजी घरात विषप्राशन केले. तत्पूर्वी त्याने चिठ्ठी लिहून या सर्व प्रकरणाची माहिती नमूद केली होती.
विषप्राशन केल्याने परदेशी यास संदर्भ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना परदेशी याचा गुरूवारी मृत्यू झाला. भावाला घरात चिठ्ठी सापडल्याने या घटनेचा उलगडा झाला. याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०८ सह महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे कलम ३९, ४५ अन्वये गुन्हा नोंदवला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक शांताराम महाजन तपास करत आहेत.

























