नाशिक – विशेष प्रतिनिधी
नाशिकच्या सायली वाणी व तनिशा कोटेचा या दोघींची जागतिक विद्यापीठ टेबल टेनिस स्पर्धेसाठी भारतीय विद्यापीठ संघात निवड झाली. या जागतिक विद्यापीठ खेळांच्या स्पर्धा जर्मनी मध्ये १६ ते २७ जुलै दरम्यान होणार आहेत. नाशिकच्या इतिहासात दोन महिला खेळाडू प्रथमच जागतिक विद्यापीठ टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय विद्यापीठ संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. यापूर्वी १९७० मधे कोलंबो येथे झालेल्या जागतिक विद्यापीठ स्पर्धेसाठी नाशिकच्या कै. प्रकाश (बाबा) सौदाणकर यांची निवड भारतीय विद्यापीठ संघात निवड झाली होती.
सायली वाणी आणि तनिशा कोटेचा या दोघींनीही आजवर ज्यूनियर एशियन चॅम्पियनशिप, ज्यूनियर साउथ एशियन गेम चॅम्पियनशिप, ज्यूनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप व ब्रिक्स गेम्स अशा महत्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनितिधित्व करत भारतासाठी पदके मिळविली.
सायली वाणीची डिसेंबर २०२४ मधे भारतीय महिला संघात जागतिक आईटीटीएफ मिश्र सांघिक स्पर्धेसाठी निवड झाली होती. सायली वाणीने आज पावेतो २४ आंतराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत १९ पदके पटकवली आहेत. तनीशा कोटेचा हिने आतापर्यंत ४६ वेळा भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत ३६ पदके मिळविली आहेत. तनीशा कोटेचा ही गेल्या सहा वर्षापासून भारतीय ज्युनियर संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. ट्युनिशिया येथे नुकत्याच पार पडलेल्या डब्लूटीटी यूथ कंटेंडर स्पर्धेत भारतीय महिला संघाचे तनिशा हिने प्रतिनिधित्व केले आहे. या दोघीही राष्ट्रीय जूनियर गटाच्या राष्ट्रीय विजेत्या असून दोघिनींही खेलो इंडिया या स्पर्धेतही राष्ट्रीय विजेतेपद पटकावले आहे.
तनिशा कोटेचा ही सध्या १९ वर्षाखालील मुलींच्या गटात भारतात प्रथम तर महिला गटात ५ वी मानांकित टेबल टेनिसपटू आहे. तीचे आंतराष्ट्रीय स्तरावर १९ वर्षाखालील मुलींच्या गटाचे ३५ वे तर महिला गटात तिचे २०४ तीचे मानांकन आहे. सायली वाणीला १९ वर्षाखालील मुलींच्या गटात भारतीय स्तरावर पाचवे मानांकन असून महिला गटात १० वे मानांकन आहे. सायली वाणी हिला १९ वर्षाखालील मुलींच्या गटात आंतरराष्ट्रीय ३६ वे तर महिला गटात २५४ वे मानांकन आहे. या दोघींना १९ वर्षाखालील मुलींच्या दुहेरी गटाचे जागतिक ६ वे मानांकन आहे. या दोघींनी प्रशिक्षक जय मोडक यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
या दोघींच्या निवडीबद्दल नासिक जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, राज्य टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष प्रवीण लुंकड सरचिटणीस यतिन टिपणीस, नासिक जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे उपाध्यक्ष शेखर भंडारी, मिलिंद काचोळे, सचिव राजेश भरवीरकर, कोषाध्यक्ष अभिषेक छाजेड, जय मोडक (कोच) संजय वसंत, सौ. अलका कुलकर्णी, सतीश पटेल, अलिअसगर आदमजी यांनी अभिनंदन केले आहे.

























