नाशिक – विशेष प्रतिनिधी
सिडकोतील स्टेट बँक चौक ते महात्मा गांधी रोड असा रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलेसोबत अश्लिल कृत्य करण्याचा खळबळजनक प्रकार २२ जूनला समोर आला होता. या घटनेची गंभीर दखल घेत गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने कौशल्याने तपास करून त्या चालकास अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नासिर खलील शेख (वय-२५, रा. गल्ली नं १०, वडाळारोड, भारतनगर) असे त्या नराधमाचे नाव आहे. दि. २२ जूनला रात्री आठ वाजता पिडीत महिला सिडकोतील स्टेट बँक चौकातून महात्मा गांधी रोड येथे जाण्यासाठी बसली होती. चालकाने महात्मा गांधी रोडवरील यशवंत व्यायाम शाळेजवळ रिक्षा थांबवून पिडीतेसोबत अश्लिल कृत्य करून त्यांचा विनयभंग केला. यामुळे भेदरलेल्या महिलेने सरकारवाडा पोलीस ठाण्यात जाऊन आपली फिर्याद नोंदवली. याप्रकरणी अज्ञात चालकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता.
हा गुन्हा संवेदनशील असल्याने पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी जातीने तपासात लक्ष घातले होते. गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, सहायक निरीक्षक हिरामण भोये, उपनिरीक्षक सुदाम सांगळे, हवालदार विशाल काठे, प्रविण वाघमारे, प्रशांत मरकड, प्रदिप म्हसदे, संदिप भांड, विशाल देवरे, मिलीदसिंग परदेशी, रमेश कोळी, धनंजय शिंदे, मुक्तार शेख, अमोल कोष्टी, जगेश्वर बोरसे, गोरक्ष साबळे यांनी कौशल्याने तपास करून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपीस सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

























