नाशिक – विशेष प्रतिनिधी
आरोग्य खात्यात विविध पदांवर कंत्राटी पध्दतीने नोकरीस लावून देण्याचे आमिष दाखवून तब्बल एक कोटी ४० लाखांना चुना लावणारा वैभव विजय पोळ (शिवांजली सोल्युशन्स, अशोक स्तंभ) हा श्रीवर्धन (जि. रायगड) येथील समुद्रकिनारी शहर पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाच्या जाळ्यात सापडला आहे. त्याकडून इनोव्हा क्रिस्टासह २२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबतचे अधिक वृत्त असे की, शिवांजली सोल्युशन्स, अशोक स्तंभ येथील कार्यालयात कविता प्रशांत भदाणे व वैभव विजय पोळ यांनी संगनमताने साक्री तालुक्यातील एकूण ९० उमेदवारांना धुळे जिल्हयातील आरोग्य खात्यासंदर्भातील सफाई कामगार, शिपाई, चालक, सुपरवायझर, लॅब टेक्नीशियन, नर्सिंग या जागेवर कंत्राटी पध्दतीने नोकरीस भरती करुन देण्याचे आमिष दाखवले. या ९० उमेदवारांकडून एकूण एक कोटी चाळीस लाख रुपये घेतले. मात्र उमेदवारांना कुठल्याही कंत्राटी नोकरीस भरती केले नाही व उमेदवारांची आर्थिक फसवणूक केली म्हणून सरकारवाडा पोलीस ठाण्यात कुणाल गुलाबराव भदाणे यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.
हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने तसेच दोन्ही आरोपी फरार असल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आरोपींचा माग काढण्याचे आदेश गुंडाविरोधी पथकाला दिले होते. त्यानुसार आरोपींचा ठावाठिकाणा शोधत असताना सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना माहिती मिळाली की, गुन्हयातील मुख्य आरोपी वैभव पोळ हा सध्या श्रीवर्धन (जिल्हा रायगड) येथे वास्तव्यास आहे. त्यांनी याबाबत पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, परिमंडळ एकचे किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांनी गुंडा विरोधी पथकाचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार विजय सुर्यवंशी, प्रदिप ठाकरे, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, राजेश राठोड, कल्पेश जाधव यांना तातडीने रवाना केले. तिथे मानवी कौशल्य व तांत्रिक विश्लेषणाद्वारे संशयित हा समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या हॉटेलमध्ये वास्तव्यास असल्याचे निदर्शनास आले.
त्यानुसार परिसरातील रिसॉर्ट, होम स्टे हॉटेल येथे रात्रभर तपासणी करुन वैभव विजय पोळ (वय-४९ वर्षे रा. ब्राम्हण आळी, अलिबाग जिल्हा रायगड) यास नवमी रिसॉर्ट, भैरवनाथ पाखाडी रोड, श्रीवर्धन येथून आज (दि. ०८) पहाटे शिताफीने ताब्यात घेतले त्यावेळी त्याचे ताब्यातील चारचाकी इनोव्हा क्रिस्टा वाहन (एमएच ०६ – सीडी ८०८१) व मोबाईल असा २२ लाख २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. संशयितास सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कामगिरीबद्दल गुंडा विरोधी पथकाचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ, विजय सुर्यवंशी, सुनिल आडके, प्रदिप ठाकरे, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, राजेश राठोड, कल्पेश जाधव, सुनिता कवडे यांचे वरिष्ठांनी कौतूक केले आहे.

























