मुंबई –
महाराष्ट्राला पडलेल्या अनेक प्रश्नांपैकी एक अनुत्तरीत प्रश्न म्हणजे ‘ठाकरे बंधू’ एकत्र येणार का ?. राजकीय पदाधिकारी या प्रश्नाचे आपापल्या परीने उत्तर शोधत असले तरी याबाबत आता जनमताचा रेटा वाटत चाललेला आहे. मुंबईतील मराठी माणसाचा मानबिंदू असणाऱ्या गिरगावातूनही आता उद्धव व राज ठाकरे यांना ‘एकत्र या’ अशी साद घालताना मराठी माणसाला वाचवण्याचे साकडे घातले आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षाची ताकद क्षीण झाली. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरणात खरी उलथापालथ झाली ती शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेने. त्यातच कल्याणमध्ये शिवसैनिक व मनसैनिक यांनी एकत्र केलेले आंदोलन असो वा नाशिकमधील मनसे पक्ष कार्यालयाच्या वास्तूशांतीला उपस्थित असलेले शिवसेना पदाधिकारी असो, यामुळे दोघा बंधूंचे अद्याप ठरलेले नसले तरी कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या वर्तनातून पक्षप्रमुखांपर्यंत आपली भावना पोहचवत आहे. “ठाकरे” एक हैं तो “महाराष्ट्र” सेफ हैं!!!, यासारखे संदेश समाज माध्यमांवर फिरत आहे.

त्यातच आता मुंबईतील गिरगावसारख्या भागात ठाकरे बंधूंना साकडे घालणारे बॅनर झळकत आहे. त्या बॅनरवर ‘परप्रांतीयांचे महाराष्ट्र मिळवायचे मनसुबे पूर्ण होण्याआधी एकत्र या आणि मराठी माणसाला वाचवा, ८ करोड मराठी जनता दोघे एकत्र येण्याची आतुरतेने वाट पाहत आहे’ असा मजकूर असून या बॅनरची मुंबईत जोरदार चर्चा असून हे बॅनर समाजमाध्यमांद्वारे राज्यभरात पोहचले आहे.

























