नाशिक – विशेष प्रतिनिधी
नाशिकसह अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महामार्ग तसेच बाजार समित्यांच्या परिसरात रात्री उभ्या असलेल्या ट्रकमधील डिझेल चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील प्रसाद दत्तात्रय वाडेकर (वय २१, रा. रांजणगाव खुर्द, गणेशनगर, ता. राहता, जि. अहिल्यानगर) यास नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा पथकाने जेरबंद केले आहे. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरली जाणारी इनोव्हा कार तसेच रोकड असा सुमारे सात लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एलसीबी’ चे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर, उपनिरीक्षक सुदर्शन बोडके, सहायक उपनिरीक्षक नवनाथ सानप, पोलीस अंमलदार विनोद टिळे, सतिष घुटे, हेमंत गरूड, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, नितीन गांगुर्डे यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, दि. ११ अॉगस्ट रोजी मध्यरात्रीचे सुमारास अज्ञात आरोपींनी सायखेडा मार्केट यार्ड परिसरात उभ्या असलेल्या दोन मालट्रकांचे डिझेल टँक मधुन ३८,६८८/- रूपये किंमतीचे ४२५ लिटर डिझेल चोरून नेले होते. सदर बाबत सायखेडा पोलीस ठाणेस गुरनं १४३/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वरील गुन्हयाचे समांतर तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार अहिल्यानगर जिल्हयातील राहता येथील डिझेल चोरी करणारे गुन्हेगारांनी सदरचा गुन्हा केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार स्थागुशाचे पथकाने राहता तालुका परिसरातून गुन्हेगार प्रसाद दत्तात्रय वाडेकर यास ताब्यात घेऊन वरील गुन्हयाबाबत चौकशी केली असता, त्याने साथीदार नामे अमोल कुंदे (रा. एकरूखे, ता. राहता) व अजय भोसले (रा. शिर्डी, ता. राहता) यांच्यासह मिळून त्यांच्याकडील इनोव्हा व ईर्टीगा कारमध्ये सायखेडा (ता. निफाड) याठिकाणी येवुन सायखेडा कांदा मार्केट परिसरात उभ्या असलेल्या ट्रकांमधुन डिझेल चोरी केली असल्याची कबुली दिली. तसेच चोरी केलेले डिझेल विक्री करून त्यातील आलेले पैसे सदर आरोपीतांनी आप-आपसात वाटून घेतले असल्याचे निष्पन्न झाले आहे.
यातील प्रसाद दत्तात्रय वाडेकर याच्या कब्जातून वरील गुन्हयात वापरलेली सफेद रंगाची इनोव्हा कार (एम.एच.०४. डी.जे.४१११) व रोख रक्कम १२,६००/- रूपये असा एकुण ७,१२,६००/-रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यातील आरोपी प्रसाद वाडेकर याचेवर यापुर्वी मनमाड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल असून, फरार आरोपी अजय भोसले व अमोल कुंदे यांचेवर यापुर्वी अहिल्यानगर, छ. संभाजीनगर, नाशिक जिल्हयात डिझेल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपींनी यापुर्वी मुंबई आग्रा हायवेवरील दहावा मैल परिसर, सायखेडा व सिन्नर शिर्डी महामार्गावर रात्रीच्या वेळी उभ्या असलेल्या टूकांमधून डिझेल चोरी केलेली असल्याचे सांगितले असून त्यांचेकडुन डिझेल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

























