– अटक न झाल्यास मोर्चा काढण्याचा इशारा
पंचवटी – विशेष प्रतिनिधी
नांदूर नाका परिसरात पोळा सणाच्या दिवशी जमावाने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला व उपचारादरम्यान मृत्यू पावलेल्या राहूल धोत्रे या युवकाच्या हत्येप्रकरणी संशयित व माजी नगरसेवक उद्धव निमसे याच्या अडचणी वाढल्या आहेत. आता जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागणे अथवा पोलिसांना शरण जाणे एवढेच दोन पर्याय निमसेसमोर आहेत. त्यामुळे या प्रकरणाकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.
पोळा सणाच्या (दि.२२ अॉगस्ट) दिवशी दुचाकीचा धक्का लागल्यावरून झालेल्या वादानंतर निमसे समर्थकांनी राहूल धोत्रे तसेच त्याचा आतेभाऊ अजय कुसाळकर यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवण्यात आला होता. यात दोघेही गंभीर जखमी झाले होते. खासगी रुग्णालयात उपचार घेताना राहूलचा मृत्यू झाल्याने या गुन्ह्याला खुनाचे वाढीव कलम लागले होते.

मृत राहूल धोत्रे
यात भाजपचा माजी नगरसेवक व स्थायी समितीचा माजी अध्यक्ष उद्धव निमसे संशयित म्हणून समावेश होता. अटक टाळण्यासाठी उद्धव निमसे याने प्रथम जिल्हा न्यायालय व नंतर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र दोन्ही ठिकाणी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आले होते. एवढेच नाही तर उच्च न्यायालयाने पोलिसांच्या तपासाबाबत ताशेरे ओढले होते. त्यामुळे आता निमसेसमोर केवळ सर्वोच्च न्यायालयात धाव घेणे अथवा अटकेला सामोरे जाणे, एवढेच दोन पर्याय शिल्लक आहेत.
… धोत्रे परिवाराचा इशारा
मुंबई उच्च न्यायालयाने उद्धव निमसे याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना मृत राहूल याचा भाऊ तसेच वडिलांना या प्रकरणात आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय पिसे व सहायक निरीक्षक निखिल बोंडे यांनी केलेल्या प्राथमिक तपासाबाबत नाराजी व्यक्त केली. निमसे याला पूरक भुमिका घेतल्याचा आरोप धोत्रे पितापुत्रांनी केला असून सध्या सहायक आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास योग्य मार्गाने होत आहे. मात्र उद्धव निमसे याला तीन दिवसात अटक न झाल्यास मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.

























