– ट्रकसह ८० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
अहिल्यानगर – विशेष प्रतिनिधी
ओडिसा राज्यातून विक्रीसाठी आणलेला १२० किलो ९०५ ग्रॅम वजनाचा व तब्बल ३० लाख रुपये किंमतीचा गांजा हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखा अर्थात ‘एलसीबी’ च्या पथकाला यश आले आहे. या कारवाईत ट्रकसह ८० लाख ८३ हजार ४६४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईने गांजा तस्करीचे कंबरडे मोडले जाणार आहे.
अहिल्यानगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे नोडल अधिकारी तथा ‘एलसीबी’ चे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, उपनिरीक्षक अनंत सालगुडे, राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार अतुल लोटके, गणेश लोंढे, संतोष खैरे, दिपक घाटकर, फुरकान शेख, लक्ष्मण खोकले, राहुल द्वारके, अमृत आढाव, आकाश काळे, रमिझराजा आतार, प्रकाश मांडगे, सागर ससाणे, भगवान धुळे, उमाकांत गावडे, अरुण मोरे, जयराम जंगले यांनी ही कामगिरी बजावली आहे.
ओडिसा राज्यातून दोन जण ट्रकद्वारे गांजाची तस्करी करणार असल्याची खात्रीलायक माहिती पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळाली होती. त्यांनी याबाबत दोन पथके स्थापन करून शोध सुरू केला. तेव्हा ट्रक क्रमांक (एमएच १४ जीयु २१११) यातून विक्रीसाठी गांजा आणला जात असल्याची माहिती मिळाली. ‘एलसीबी’ च्या पथकाने अहिल्यानगर ग्रामीण उपविभागातील फॉरेन्सिक टिमसह शेंडी बायपास ते एमआयडीसी कडे जाणाऱ्या रोडवर वडगांव गुप्ता गावचे शिवारातील हॉटेल किनाराजवळ सापळा रचला.तेव्हा संबंधित ट्रक येतांना दिसल्याने त्यास रोखण्यात आले. फॉरेन्सिक टिमच्या मदतीने झडती घेतली असता ट्रकच्या केबीनवरील टपावर सहा गोण्यांमध्ये ३०,२२,६२५ रुपये किमतीचा
१२० किलो ९०५ ग्रॅम गांजासह एकूण ८० लाख ८३ हजार ४६४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी नवनाथ अंबादास मेटे (वय ३८, रा. ढोरजे, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर), ज्ञानेश्वर दत्तात्रय फुंदे (वय ३१, रा. मळेगांव, ता. शेवगांव, जि. अहिल्यानगर) यांना अटक करण्यात आला असून ज्यांच्यासाठी हा माल विक्री करण्याकरिता आणला होता, त्यांचा शोध सुरू आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गांजा तस्करांविरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा सन १९८५ चे कलम ८ (क), २० (ब) ii (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

























