– खुनाचे वाढीव कलम लागले…
नाशिक – विशेष प्रतिनिधी
नांदूर नाका परिसरात किरकोळ वादातून दोघा युवकांवर झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणातील
गंभीर जखमी राहूल संजय धोत्रे याचा उपचारादरम्यान शुक्रवारी (दि.२९) सकाळी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात तणाव व शोकाकूल वातावरण असून या गुन्ह्याला आता खुनाचे वाढीव कलम लागले आहे.
याबाबतचे अधिक वृत्त असे की, २२ अॉगस्ट रोजी सायंकाळी जनार्दन नगर (नांदुर नाका) परिसरात किरकोळ कारणावरून दोन युवकांवर प्राणघातक हल्ला झाला होता. या हल्ल्यात राहुल धोत्रे व त्याचा आतेभाऊ अजय कुसाळकर गंभीररित्या जखमी झाले होते. दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. याप्रकरणी व्हायरल झालेल्या व्हिडिओ व सीसीटीव्ही फुटेजमध्ये जखमी युवकांवर निर्दयपणे कोयत्याने वार होत असल्याचे दिसून आल्याने खळबळ उडाली होती.
याप्रकरणी आडगाव पोलिसांनी नगरसेवक उद्धव निमसे यांच्यासह उद्धव उर्फ बाबा बाबुराव निमसे, पवन निमसे, संतोष मते, सचिन दिंडे, स्वप्निल बागुल, सुधीर निमसे, अक्षय अशोक पगार, मेघराज जोजारे, गणेश राजाभाऊ निमसे, रोशन जगताप, सुमित हांडोरे व इतरांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यापैकी मेघराज सुनील जोजारे, गणेश राजाभाऊ निमसे, रोशन लक्ष्मण जगताप, अक्षय अशोक पगार, सुधीर उर्फ गोटीराम माधवराव निमसे यांना अटक करण्यात आली होती.
शुक्रवारी सकाळी राहुल धोत्रे याचे निधन झाल्याचे वृत्त पसरताच नांदूर नाका परिसरात तणाव व शोकाकुल वातावरण पसरले. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्तात वाढ केली आहे. दरम्यान, या प्रकरणात माजी नगरसेवक उद्धव निमसे यांना न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला होता. या अर्जावर आजच अंतिम सुनावणी होणार होती. परंतू आता राहूल धोत्रे याच्या मृत्यूने या गुन्ह्याला खुनाचे वाढीव कलम लागले असल्याने भाजपाचे माजी नगरसेवक उद्धव उर्फ बाबा बाबुराव निमसे यांच्या समोरील कायदेशीर अडचणी वाढल्या आहेत. आडगाव पोलिसांनी उद्धव निमसेसह इतर फरारींच्या शोधासाठी पथके पाठवली आहेत.

























